मनोज जरांगेंच्या जीवनावरील ‘संघर्षयोद्धा’ सिनेमा प्रदर्शनाबाबत महत्वाची अपडेट

| Updated on: Apr 22, 2024 | 7:55 PM

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Movie Latest Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एक सिनेमा येतो आहे. येत्या 26 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत महत्वाची अपडेट... वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंच्या जीवनावरील संघर्षयोद्धा सिनेमा प्रदर्शनाबाबत महत्वाची अपडेट
Follow us on

मनोज जरांगे पाटील… मराठा आरक्षण आंदोलनातील चर्चित नाव… मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं. महाराष्ट्रभर दौरा केला. त्यांच्या जीवनातील संघर्षावर आता एक सिनेमा येतो आहे. या सिनेमाबाबत सिनेरसिकांसोबतच मराठा बांधवांमध्ये उत्सुकता आहे. येत्या 26 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे, असं चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलं आहे.

संघर्षयोद्धा हा सिनेमा 26 एप्रिल या दिवशी रिलीज होणार होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होतोय. हा चित्रपट आता येत्या 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असं सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी म्हटलं आहे.

जरांगेंची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणाला…

सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टींमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही, असं सेन्सॉर बोर्डने सांगितलं आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे. आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला याचं दुःख होत आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार, असं चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारा अभिनेते रोहन पाटील याने म्हटलं आहे.

मनोज जरांगे यावर काय म्हणाले?

आपला “संघर्षयोद्धा” चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डाने थांबवला असला. तरी 21 जून 2024 या नव्या तारखेला मी चॅलेंज देऊन सांगतो की सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट बघेल. त्याच बरोबर माझ्या ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहेतच.‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल. तर गाठ माझ्याशी आहे. मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटाविषयी बोलेल. त्याचबरोबर माझ्या 8 जून रोजी होणाऱ्या 900 एकर सभेत देखील आपल्या 21 जून 2024 ला प्रदर्शित होणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाविषयी प्रमोशन करा, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.