मराठी माणसांची सटकली तर भैय्या महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल; ‘हरिओम’च्या संवादाला समाजवादीचा आक्षेप

| Updated on: Oct 21, 2022 | 11:00 AM

पुरुषोत्तम भैय्या, हा माझा महाराष्ट्र आहे. जर मराठी माणसांची सटकली तर महाराष्ट्राच्या नकाशावरून तुला आणि तुझ्या भावाला गायब करू, असा संवाद हरिओम या मराठी सिनेमात आहे.

मराठी माणसांची सटकली तर भैय्या महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल; हरिओमच्या संवादाला समाजवादीचा आक्षेप
तर भैय्या महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल; 'हरिओम'च्या संवादाला समाजवादीचा आक्षेप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ‘हरिओम’ या मराठी सिनेमातील (hariom movie) एका संवादावरून सध्या वाद सुरू आहेत. या सिनेमातील एक संवादाला समाजवादी पार्टीने (samajwadi party) आक्षेप घेतला आहे. या सिनेमातून भैय्या (bhaiyya) महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संवादाला समाजवादी पार्टीने आक्षेप घेतला असून तात्काळ हा संवाद सिनेमातून वगळण्याची मागणी केली आहे. हा संवाद सिनेमातून वगळला नाही तर सिनेमा थिएटर बाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीने दिला आहे.

हरिओम हा मराठी सिनेमा 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या एका संवादावरून समाजवादी पार्टीने संताप व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टीचे कांदिवली चारकोप विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अझहर सिद्दीकी संतापले आहेत. त्यांनी थेट कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन निर्मात्याला या सिनेमातील संवाद काढून टाकण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

पुरुषोत्तम भैय्या, हा माझा महाराष्ट्र आहे. जर मराठी माणसांची सटकली तर महाराष्ट्राच्या नकाशावरून तुला आणि तुझ्या भावाला गायब करू, असा संवाद हरिओम या मराठी सिनेमात आहे. या संवादालाच सपाच्या अझहर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे. या सिनेमातून भैय्याला महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब करण्याची धमकी दिली आहे. दोन समाजात तेढ वाढवण्याचा हा प्रकार असून हा संवाद सिनेमात असता कामा नये , असं सिद्दीकी यानी म्हटलं आहे.

सिद्दीकी यांनी कांदिवली पोलिसांकडे धाव घेऊन ही मागणी केली आहे. या सिनेमातील उत्तर भारतीयांविषयीचे अपशब्द काढून टाकावेत. तसेच सिनेमाच्या निर्मात्यांनी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. निर्मात्याने सिनेमातील संवाद काढून उत्तर भारतीयांची माफी न मागितल्यास थिएटर बाहेर आंदोलन करण्याची धमकी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

‘हरिओम’ या मराठी चित्रपटातील एका संवादावर मुंबई पोलिसांकडून कारवाईची मागणी करत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरबाहेर आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, या वादावर हरिओमच्या निर्मात्याची काही प्रतिक्रिया आलेली नाही. ते या मुद्द्यावर काय बोलतात याकडे मराठी सिनेसृष्टीचं लक्ष लागलं आहे.