मुख्यमंत्र्यांना सर्वांसमक्ष जाब विचारला, रिपब्लिकन ऐक्यासाठी धडपड; वाचा एका शाहिराची कथा!

| Updated on: Aug 16, 2021 | 7:47 AM

शाहीर यमराज पंडित यांनी अत्यंत स्फोटक आणि विद्रोही गाणी लिहिली. आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन ऐक्य हा त्यांच्या गाण्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. (shahir yamraj pandit was trying to unite republican movement)

मुख्यमंत्र्यांना सर्वांसमक्ष जाब विचारला, रिपब्लिकन ऐक्यासाठी धडपड; वाचा एका शाहिराची कथा!
ambedkaree geet
Follow us on

मुंबई: शाहीर यमराज पंडित यांनी अत्यंत स्फोटक आणि विद्रोही गाणी लिहिली. आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन ऐक्य हा त्यांच्या गाण्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून चळवळीला जशी उभारी देण्याचा प्रयत्न केला तर चुकीच्यावेळी चळवळीवर आसूडही ओढले. शाहीर अत्यंत रोखठोक स्वभावाचे होते. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाही जाब विचारण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शाहिरांच्या जीवनातील या सर्व घटनाघडामोडींवर टाकलेला हा झोत. (shahir yamraj pandit was trying to unite republican movement)

मी करतोय दावा, रंक आणि रावा,
पाहिजे तर पैज लावा,
फक्त वगळून भीमाच्या नावा,
तुम्ही पुढारी होऊन दावा…

किंवा

जाणून बुजून धुळी मिळवलाय,
भीमरायाचा समाज,
समाजामधला स घालवलाय,
बाकी ठेवलाय माज…

किंवा

निळा झेंडा खांद्यावर घेऊन,
तोऱ्यात डोलू नका,
जनामनाची लाज असेल तर,
तुम्ही जयभीम बोलू नका…

शाहीर यमराज पंडित यांनी अशा प्रकारची विद्रोही आणि स्फोटक गीते लिहिली. रिपब्लिकन ऐक्य आणि आंबडेकरी समाजातील स्थित्यंतरे हा त्यांच्या गाण्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. रिपब्लिकन ऐक्य ही त्यांची आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे त्यांची गाणी ही चळवळी भोवती फिरत असतात. त्यांच्या गाण्यातून कधी चळवळीची वाताहत मांडली जाते तर कधी चळवळीवर कठोर शब्दात प्रहारही केले जातात.

माझा मार्ग क्रांतीचा

माझा मार्ग क्रांतीचा आहे. त्या वाटेवर मी एकटाच चाललोय. माझ्यापाठी कोणी नाही. त्यामुळेच मी गायन पार्टी स्थापन केली नाही. समाजातील दुफळी साधण्यासाठी गायनातून धडपड करतोय, असं ते नेहमी सांगायचे. विशेष म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत ते त्यांच्या शब्दाला जागले.

ऐक्य साधण्याचा प्रयत्न

रिपब्लिकन नेते गंगाराम इंदिसे यांच्या सहकार्याने त्यांनी रिपब्लिकन ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना हयातीत यश आलं नाही. त्याची असंख्य कारणं आहेत. पण शाहिरांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. एकीकडे हे सुरू असतानाच त्यांनी गाण्याला कधीच धंद्याचं स्वरुप येऊ दिलं नाही. पैसा कमावण्यासाठी मागणी तशी पुरवठा अशी गाणी त्यांनी लिहिली नाही. त्यामुळेच त्यांच्या गाण्याच्या कधी कॅसेट बाजारात आल्या नाहीत. बिदागी घेऊन कधी गाण्याचे कार्यक्रमही केले नाहीत. मिळेल त्या मंचावर जाऊन ते आपलं गाणं एकाग्रतेने गायचे.

1998 ते 2002 पर्यंत परळ भोईवाड्यातील महात्मा फुले तांत्रिक विद्यालयात उठाव साहित्य मंचाचे कविसंमेलन व्हायचं. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा काव्योत्सव भरायचा. त्या कार्यक्रमाला पंडित आवर्जून हजेरी लावायचे आणि तरुणांसोबत बसून आपल्या कविता ऐकवायचे.

मुख्यमंत्र्यांसोबत सवालजवाब

शहिदोंने वतन पर,
खुद का कत्ल-ए-आम कर डाला,
वफादारोंने वतन पर घर का घर,
नीलाम कर डाला,
मगर नेताओने इससे भी बढकर,
काम कर डाला,
के मुल्क आझाद होकर भी,
जीना हराम कर डाला…

पंडितांची शाहिरी अशी होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्यासमोर रात्री 12 वाजता पंडित यांनी हा शेर सादर केला होता. 1971 ची ही गोष्ट. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हा शेर सादर केला होता. त्यावर, वसंतराव नाईक म्हणाले, यमराजजी आप ये क्या गा रहे हो? त्यावर पंडित म्हणाले, गलत क्या है? तेव्हा वसंतराव पुन्हा म्हणाले, ऐसा गाना नही चाहीए. पंडित यांना राहवलं नाही. तेही पुन्हा उद्गारले, हम गली गली में चंदा जमा कर रहे है, रात के बारह बजे है. दिल्लीवाले जागते होंगे क्या? पंडितांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढचा संवादच बंद केला. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (shahir yamraj pandit was trying to unite republican movement)

 

संबंधित बातम्या:

लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

(shahir yamraj pandit was trying to unite republican movement)