
‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील काही दावे, संदर्भ यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू महासंघाने केली आहे. त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसंच चित्रपटाच्या निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की त्यावर बंदी घातली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून तो ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठीही निवडला गेला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवल्याचा दावा हिंदू महासंघाने केला आहे. निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं विकृतीकरण केलं आहे, त्यांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आनंद दवे यांनी केला आहे. हा चित्रपटावर बंदी घातली नाही तर चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित होईल तिथे आंदोलन करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
“या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल आहे. पुण्यातील एकाही थिएटरने हा चित्रपट दाखवू नये. आम्ही त्यांना आवाहन करतो. जर हा चित्रपट गावखेड्यात दाखवला तर त्या सिनेमागृहात जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्याख्यान करणार आहोत. आम्ही यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाकडेही तक्रार केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यात अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचं पाहायला मिळालं. म्हणून आमचा या चित्रपटाला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते, ते हिंदूचे होते, ते मराठ्यांचे होते. ‘खालिद का शिवाजी’ हा नेमका काय प्रकार आहे, यावरच आमचा आक्षेप आहे,” असं दवेंनी म्हटलंय.
दरम्यान या चित्रपटाविरुद्ध सकल हिंदू समाजाने ऑनलाइन विरोध केल्यानंतर मुंबई पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी औपचारिक नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांच्या भांडुप विभागाने एका व्हॉट्स ॲप ग्रुपच्या ॲडमिनला नोटीस बजावली आहे. या ग्रुपच्या सदस्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला विरोध करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं होतं. याविषयी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अशा संदेशांमुळे अशांतता निर्माण होऊ शकते, म्हणून कारवाई केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद नावाच्या एका तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे, जो त्याच्या धर्मामुळे एकटा पडतो. त्यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन त्याच्या शक्तीचा आणि उद्देशाचा शोध घेतो. या चित्रपटाला एकीकडून तीव्र विरोध होत असला तरी समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळतेय. या वर्षाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी निवडलेल्या काही मराठी चित्रपटांपैकी हा एक होता. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीसुद्धा चित्रपटाचं कौतुक केलं आणि त्याची निवड मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं होतं.