‘स्त्री 2’मध्ये सरकटाची भूमिका कोणी साकारली? त्याची ‘द ग्रेट खली’पेक्षाही जास्त उंची

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 60 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 200 कोटींच्या कलेक्शनजवळ पोहोचला आहे. यामध्ये सरकटाची दहशत पहायला मिळते. ही भूमिका कोणी साकारली ते जाणून घ्या..

स्त्री 2मध्ये सरकटाची भूमिका कोणी साकारली? त्याची द ग्रेट खलीपेक्षाही जास्त उंची
Stree 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2024 | 2:28 PM

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. श्रद्धा-राजकुमारसोबत यातील इतरही भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर ‘सरकटा’च्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही भूमिका कोणी साकारली हे तुम्हाला माहित आहे का? ‘स्त्री 2’ प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर त्यातील ‘सरकटा’ या खलनायकाच्या चेहऱ्यावरून पडदा उचलण्यात आला आहे. सुनील कुमारने चित्रपटात ही भूमिका साकारली आहे.

मूळचा जम्मूचा असलेला सुनील कुमार हा ‘जम्मूचा द ग्रेट खली’ म्हणून ओळखला जातो. त्यानेच ‘स्त्री 2’मध्ये सर्वांची घाबरगुंडी उडवणाऱ्या सरकटाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्याची उंची खलीपेक्षाही जास्त आहे. ‘द ग्रेट खली’ची उंची 7 फूट 3 इंच इतकी आहे. तर सुनील कुमारची उंची ही 7 फूट 6 इंच इतकी आहे. तो प्रोफेशनल रेसलर असून 2019 मध्ये त्याने ‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या (WWE) ट्रायआऊटमध्ये भाग घेतला होता. ‘द ग्रेट अंगार’ असं त्याला रिंगमध्ये नाव देण्यात आलं आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची त्याची इच्छा आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, सुनील कुमार हा जम्मू आणि काश्मीर पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. हँडबॉल आणि व्हॉलीबॉलचा खेळाडू असलेल्या सुनीलने स्पोर्ट्स कोटामधून ही नोकरी मिळवली आहे. सरकटाच्या भूमिकेसाठी सुनीलची निवड केल्याबद्दल दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले, “कास्टिंग टीमने त्याची निवड केली. आम्हाला खूप उंचीचाच माणूस त्या भूमिकेसाठी हवा होता. त्यासाठी सुनील परफेक्ट होता. आम्ही त्याच्या बॉडीचे शॉट्स घेतले आणि चित्रपटात दिसणारा त्याचा चेहरा हा CGI तंत्रज्ञानापासून बनवण्यात आला आहे.”

‘स्त्री 2’मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, सुनील कुमार यांच्यासोबतच पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत भारतात तब्बल 228.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’चा सीक्वेल आहे.