
Miss Universe 2025: बऱ्याच वादानंतर अखेर ‘मिस युनिव्हर्स 2025’ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मेक्सिकोच्या फातिमा बॉशने (Fatima Bosch) ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट आपल्या नावे केला आहे. फिनाले जवळ आला असताना ही सौंदर्यस्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. फिनालेच्या तीन दिवस आधी दोन परीक्षकांनी राजीनामा देत ‘मिस युनिव्हर्स’च्या एकंदर कारभारावर जोरदार टिप्पणी केली होती. इतकंच नव्हे तर सर्वकाही आधीपासूनच ठरलेलं होतं, स्पर्धकाचं परीक्षकाशी अफेअर होतं, असे धक्कादायक आरोप परीक्षक ओमर हरफॉच यांनी केले होते. त्यामुळे मेक्सिकोची फातिमा विजेती ठरली असली तरी ही सौंदर्यस्पर्धा या सर्व कारणांमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.
एका लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान थाई स्पर्धेच्या दिग्दर्शकाने फातिमाला फटकारलं होतं आणि त्यानंतर अनेक स्पर्धकांनी त्यातून काढता पाय घेतला होता. तीच फातिमा आता चाहत्यांची आवडती बनली आहे. 25 वर्षीय फातिमाला गेल्या वर्षीची विजेती डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेइलविगने मुकूट घातला. मिस युनिव्हर्ससाठी प्रत्येक देशातील प्रतिनिधींची निवड स्थानिक स्पर्धांद्वारे केली जाते. त्यानंतर त्यांना जागतिक स्तरावर एकत्र आणलं जातं. थायलंडच्या बँकॉकमध्ये या स्पर्धेचा फिनाले पार पडला आणि थायलंडची प्रवीणर सिंहने यात दुसरं स्थान पटकावलं आहे. तर टॉप 5 स्पर्धकांमध्ये व्हेनेझुएलाची स्टेफनी अबासली, फिलिपिन्सची अहतिसा मनालो आणि आयव्हरी कोस्टची ऑलिव्हिया यास यांचा समावेश होता. 120 देशातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
या स्पर्धेत मनिका विश्वकर्मा भारताचं प्रतिनिधीत्व करत होतं. परंतु टॉप 12 मध्ये स्थान मिळवल्यानंतर तिचा पराभव झाला. याआधी 2021 मध्ये भारताच्या हरनाज कौर संधूने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता. यावर्षी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या सौंदर्यस्पर्धेच्या परीक्षकांमध्ये सहभागी झाली होती.
परीक्षक उमर हरफौच यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘मिस युनिव्हर्स 2025’वर गंभीर आरोप केले होते. अधिकृत जजिंग (परीक्षण) सुरू होण्याआधीच टॉप 30 स्पर्धक आधीपासूनच निवडले गेले आहे, असा आरोप त्यांनी या स्पर्धेवर केला होता. सिक्रेट कमिटीने आधीच टॉप 30 स्पर्धक निवडले होते, असं त्यांनी म्हटलं होतं. उमर यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांना धक्का बसला होता.