मिलिंद गवळी यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन; म्हणाले, ज्या गोष्टीचं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं..

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. त्यांच्या घरात गणेश चतुर्थीच्या दिवशी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

मिलिंद गवळी यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन; म्हणाले, ज्या गोष्टीचं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं..
Milind Gawali
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2026 | 3:12 PM

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारलेले अभिनेते मिलिंद गवळी यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आणि भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आजोबा झालो, आणि दिपा आजी झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या नातीचा जन्म झाला.‌ गणपती बाप्पाचं आगमन झालं त्याच दिवशी आमच्या घरी गौराई आली,’ असं त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘मी आजोबा झालो, आणि दिपा आजी झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या नातीचा जन्म झाला.‌ गणपती बाप्पाचं आगमन झालं त्याच दिवशी आमच्या घरी गौराई आली. ज्या गोष्टीचं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण झालं. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. नऊ वर्षानंतर परमेश्वराच्या कृपेनेच आमचं लग्न झालं. लग्नाच्या एका वर्षात आमच्या घरी मिथिलाच्या रूपात राजकन्या आली. मी कलाक्षेत्रात आलो, खडतर प्रवास होता. तरी दिपामुळे संसार मात्र नीटनेटका झाला आणि या संसाराच्या प्रवासामध्ये आता आमच्या आयुष्यात एक सुंदरस वळण आलंय. आजी आणि आजोबा व्हायचं भाग्य आम्हाला मिळालंय. एक इवलासा जीव आम्हाला आजी आजोबा म्हणणार याच्यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...

‘आम्हाला जसा आनंद झाला तसा आमच्या अनेक शुभचिंतकांना आनंद होणार, बाळाला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळणार, म्हणून आमच्या आयुष्यातली ही गोड बातमी तुम्हाला सांगावीशी वाटली. आम्ही डॉक्टर मनीषा जोशी आणि डॉक्टर अभिजीत जोशी यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मिथिलाची नॉर्मल डिलिव्हरी झालीय. मला आता आजोबा हे नवीन पद मिळालं आहे माझ्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. सध्या मी चार पावलं जमिनीवरनं चालतोय, आभाळ ठेंगणं झालाय.. माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांनो माझ्या बाळाच्या बाळाला भरभरून आशीर्वाद द्या. गणपती बाप्पा मोरया,’ असं त्यांनी पुढे लिहिलं आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमीच भरभरून लिहित असतात. आयुष्यातील छोटे-मोठे क्षणही ते पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता नातीच्या जन्माचाही आनंद त्यांनी असंख्य चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us