
मिस मेक्सिको अँड्रिया मेजाने मिस युनिव्हर्स 2020 आपल्या नावावर केलं आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व करणारी 22 वर्षीय अॅडलिन कॅस्टेलिनो मिस युनिव्हर्स 2020 स्पर्धेत थर्ड रनरअप ठरत देशाचे नाव मोठं केलं आहे.

ही स्पर्धा फ्लोरिडातील हॉलीवूडमधील सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण जगातील सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी या स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं.

अॅडलिन मूळची कुवेतची आहे. तिनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की स्वत: ला स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं तिनं भारतात येण्याचं ठरवलं होतं.

मिस युनिव्हर्स 2020 स्पर्धेपूर्वी अॅडलिननं मिस दिवा युनिव्हर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे. तिचे पालक कर्नाटकचे आहेत.

मिस युनिव्हर्ससारख्या स्टेजवर पोहचणं ही एक मोठी गोष्ट आहे. अॅडलिनलासुद्धा हे स्वप्नापेक्षा काही कमी वाटतं नव्हतं. एका मुलाखतीत तिनं हा उल्लेख केला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अॅडलिन म्हणाली- 'जेव्हा मी कुवेतमध्ये मोठी होत होते, तेव्हा तिथं काही संधी मिळाली नाही. मी नेहमीच मिस युनिव्हर्स प्लॅटफॉर्मकडे पाहात होते मात्र असा विचार केला नव्हता की माझ्यासारख्या मुलीला चांगलं बोलता येत नाही, तिच्या शरीरावर डाग आहेत, तिला या प्रतिष्ठेच्या टप्प्यावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.'

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या प्रश्नावर अॅडलिन म्हणाली- 'मी एक रोमांचकारी प्रेमळ मुलगी आहे, प्रत्येक प्रसंगी माझ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक पैलू जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन'.

'तर हो, मला अॅक्टिंगची ऑफर मिळाली तर मला काही हरकत नसेल मात्र मला व्यवसायात करिअर करायचं आहे कारण मी व्यवसाय पदवीधर आहे आणि मला यात आवड आहे. माझ्यासाठी भविष्यात काय आहे ते कळेलच.