परीक्षकाचं स्पर्धकाशी अफेअर, विजेता फिक्स..; ‘मिस युनिव्हर्स 2025’वरून मोठा वाद, फिनालेआधीच परीक्षकांचा राजीनामा

मिस युनिव्हर्स ही जगभरातील सर्वांत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा आहे. अवघ्या तीन दिवसांवर या स्पर्धेचा फिनाले आला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेवर एका परीक्षकांनी गंभीर आरोप केले आहेत. परीक्षकाचं स्पर्धकाशी अफेअर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

परीक्षकाचं स्पर्धकाशी अफेअर, विजेता फिक्स..; मिस युनिव्हर्स 2025वरून मोठा वाद, फिनालेआधीच परीक्षकांचा राजीनामा
Miss Universe judge
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 19, 2025 | 8:38 PM

Miss Universe 2025 Controversy : थायलँडच्या बँकॉकमध्ये पार पडणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स 2025’ या सौंदर्यस्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रँड फिनालेच्या अवघ्या तीन दिवस आधी दोन परीक्षकांनी राजीनामा दिला आहे. त्यापैकी परीक्षक उमर हरफौच यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘मिस युनिव्हर्स 2025’वर गंभीर आरोप केले आहेत. अधिकृत जजिंग (परीक्षण) सुरू होण्याआधीच टॉप 30 स्पर्धक आधीपासूनच निवडले गेले आहे, असा आरोप त्यांनी या स्पर्धेवर केला आहे. सिक्रेट कमिटीने आधीच टॉप 30 स्पर्धक निवडले होते, असं त्यांनी म्हटलंय. उमर यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या सौंदर्यस्पर्धेवर विविध आरोप करत ते सतत सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत.

उमर यांनी इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून सांगितलं की, एक सिक्रेट कमिटी अचानक बनवण्यात आली होती, ज्यांनी स्पर्धकांना स्टेजवर न आणताच निवडलं होतं. या अनधिकृत पॅनलमध्ये असे काही लोक होते, ज्यांचं स्पर्धकांशी खासगी नातं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी एका ज्युरी मेंबरचं एका स्पर्धकाशी अफेअर असल्याचाही दावा केला आहे. “आम्ही आठ परीक्षक 136 मुलींना नाही तर फक्त 30 मुलींचं परीक्षण करणार होतो, ज्यांना आधीच शॉर्टलिस्ट केलं होतं. हे योग्य नाही आणि मी कोणाच्याच आयुष्याशी खेळू शकत नाही. मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेचे मालक राऊल रोचासोबत उद्धटपणे झालेल्या चर्चेनंतर मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे”, असं उमर यांनी सांगितलं आहे.

मिस युनिव्हर्सच्या एका स्पर्धकानेही ‘पीपल’ या मासिकेला दिलेल्या मुलाखतीत नाव न घेता उमरच्या दाव्यांना दुजोरा दिला. रिहर्सल संपवून मी जसं सोशल मीडिया उघडलं, तेव्हा मला समजलं की टॉप 30 ची यादी आधीच बनवण्यात आली होती, असं तिने सांगितलं आहे. तर दुसरीकडे उमर हरफौच यांच्या आरोपांवर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने (MUO) अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उमरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “कोणतीच अनधिकृत ज्युरी बनवण्यात आली नाही. कोणत्याच बाहेरच्या समितीला परीक्षणाची परवानगी देण्यात आली नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी उमर यांच्याविरोधात कडक कारवाईदेखील केली आहे. उमर यांच्यावर त्यांनी ‘मिस युनिव्हर्स’ ब्रँडमधून कायमची बंदी घातली आहे. “उमर यांनी खोटी माहिती पसरवल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे”, असं त्यांनी म्हटलंय.