
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निळ्या साडीतल्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी गिरीजा ओक आहे. तिच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिचा निळ्या साडीतील लूक ट्रेंडमध्ये आला. गिरीजानंतर आता आणखी एका सौंदर्यवतीचा निळ्या साडीतील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही तरुणीसुद्धा निळ्या साडीत अत्यंत सुंदर दिसत असून तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतूर आहेत. सध्या थायलँडमध्ये 74 वी ‘मिस युनिव्हर्स’ची सौंदर्यस्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मनिका विश्वकर्मा भारताचं प्रतिनिधित्व करतेय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा मनिकाचाच आहे.
येत्या 21 नोव्हेंबर रोजी मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 22 वर्षांच्या मनिकाने ऑगस्ट महिन्यात ‘मिस इंडिया युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता. ती राजस्थानच्या गंगानगर इथली आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिली आहे. या स्पर्धेशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये मनिका तिच्या लूक्सने, पोशाखाने, शालिनतेने आणि हजरजबाबीपणामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अशाच एका कार्यक्रमात तिने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. गोटा पट्टी आणि जरदोसी भरतकाम केलेली ही सॅटीनची साडी होती. मोरपंखी निळ्या रंगाच्या या साडीची बॉर्डरसुद्धा सुरेख आहे. साडीवर मोती आणि स्वारोवस्कीचं भरतकामसुद्धा पहायला मिळतंय. या साडीवर मनिकाने साजेसा नेकलेस, बिंदी आणि कानातले घातले आहेत. तर हातात तिने चंदेरी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
मनिकाच्या ‘इंडियन लूक’ने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तिच्या सौंदर्याने परदेशातल्या लोकांनाही भुरळ घातली आहे. याआधी लेहंगा परिधान करत मनिकाने रॅम्प वॉक केला होता. तेव्हासुद्धा सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. मनिकासमोर 120 देशांच्या सौंदर्यवतीसुद्धा फिक्या पडल्या आहेत. मनिकाने नेसलेल्या या निळ्या रंगाच्या साडीची किंमत तब्बल 98 हजार 500 रुपये असल्याचं कळतंय.
मनिकाने केवळ सौंदर्यस्पर्धेतच बाजी मारली नाही, तर इतरही विविध क्षेत्रात तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बिमस्टेक सेव्होकॉनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. ललित कला अकादमी आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्ससारख्या प्रतिष्ठित संस्थांनी तिला सन्मानित केलंय. त्याचसोबत ती एनसीसी पदवीधरसुद्धा आहे. मनिकाने शास्त्रीय नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय आणि तिने चित्रकलेमध्येही प्रभुत्व मिळवलं आहे.