तीन-तीन लग्न करूनही काही होत नाही, हा त्याचा… आमिरच्या तिसऱ्या लग्नावर आमदराची टीका
बॉलिवूड स्टार आमिर खानने नुकताच तिसऱ्यांदा लग्न केले. त्याने पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव यांच्या उपस्थितीत लग्न केले. आता आमिरला या तिसऱ्या लग्नावरुन चांगलेच ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नुकताच आमिर खानने तिसरे लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले. त्यांचा हा विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने राहत्या घरात झाला. त्याच्या या लग्नाला आधीच्या दोन्ही बायका उपस्थित होत्या. पण आमिर खानने तिसरे लग्न केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्यावर जोरदार टीका झाली. एका आमदाराने तर ‘अमीर खानचे तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे’ असे म्हटले आहे.
आमदारांची जोरदार टीका
अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. अमीर खानच्या लग्नाला त्यांनी ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार म्हटले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की, “अमीर खानचे तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे. जरी त्याने आपल्या पत्नींचे धर्मांतर केले नसले तरी, तीन-तीन लग्न करूनही काही होत नाही, हा त्याच्या समाजासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे.” यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, “त्याच्या पत्नीपासून झालेल्या मुलांना कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नाव दिले जाते? हिंदू समाज हे कधीही खपवून घेणार नाही.”
Gauri Spratt Ex-Husband: आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा आधीचा नवरा कोण? काय करतो?
आमदार जगताप पुढे म्हणाले, “अमीर खानने अनेक सामाजिक कामे केली म्हणून त्याला काहीही करण्याची मुभा आहे, असा गैरसमज त्याने मनातून काढून टाकावा. हिंदू समाज अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही.” आमिर खानने नुकतेच तिसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांची ही तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आमिर खानच्या लग्नाविषयी
बॉलिवूड स्टार आमिर खानने नुकताच तिसऱ्यांदा लग्न केले. त्याने पूर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्या उपस्थितीत प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत पुन्हा एकदा विवाह केला. ५ जुलै २०२६ रोजी पाली हिल येथील घरात त्याने लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान गौरीला डेट करत होता. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता त्यांचे कायदेशीर लग्न झाले आहे. पण तिसरे लग्न करताच आमिर खानला प्रचंड ट्रोल केले जात आहे.