Drishyam 3 : अजयचा ‘दृश्यम 3’ पाहून मोहनलाल यांना काय वाटलं? मल्याळमशी तुलना करताना म्हणाले…
Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. चित्रपटगृहात देखील सर्व शो हाऊसफूल होत असताना, अभिनेते मोहनलाल यांनी सिनेमाची मल्याळमशी तुलना केली आहे, सध्या सर्वत्र 'दृश्यम 3' आणि मोहनलाल यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Drishyam 3 : बॉलिवूडमध्ये हिट सिनेमांच्या यादीत आता अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमाची देखील एन्ट्री झाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘दृश्यम 3’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमाचं भारतात नेट कलेक्शन 315 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे, तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन 489 कोटींवर पोहोचलं आहे. रिलीजच्या 11 दिवसानंतरही सिनेमा दमदार कमाई करत आहे. ‘दृश्यम 3’ या वर्षाचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. समीक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भरघोस दाद नंतर, साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांनीही अजयच्या सिनेमाचं कौतुक केलं आहे.
मोहनलाल यांनी पाहिला ‘दृश्यम 3’
अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मोहनलाल म्हणतात, ‘दृश्यम- द कन्क्लूजन’ सिनेमा पाहिला आहे. ज्या पद्धतीने मेकर्सनी या प्रवासाचा शानदार शेवट केला आहे, ते पाहून मी खूप प्रभावित झालो आहे.” असं म्हणत मोहनलाल यांनी सिनेमाच्या मेकर्स आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं. त्यांनी अभिषेक पाठक, कुमार मंगत पाठक, अजय देवगण यांच्यासह संपूर्ण कास्ट आणि क्रूचं अभिनंदन देखील केलं.
तर चाहत्यांनी मोहनलाल यांच्या या कृतीचे खूप कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, मोहनलाल यांनीच मल्याळमच्या मूळ ‘दृश्यम’ फ्रँचायझीमध्ये ‘जॉर्जकुट्टी’ची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मोहनलाल यांच्याकडून झालेलं कौतुक सिनेमाच्या संपूर्ण टिमसाठी फार महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी अजय देवगण यांना मोहनलाल यांनी हा सिनेमा पहावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
मोहनलाल यांचा रिव्ह्यू विशेष ठरण्याचं कारण म्हणजे हिंदीत बनलेली ‘दृश्यम 3’ ही मल्याळमच्या ‘दृश्यम 3’ पेक्षा पूर्णपणे वेगळी बनवण्यात आली आहे. पूर्वीच सांगण्यात अलं होतं की, अजय याचा सिनेमा पूर्णपणे वेगळा आहे. अजयच्या सिनेमाची कथा मोहनलाल यांच्या मुव्हीपेक्षा बरीच वेगळी आहे. हिंदीत बनलेल्या ‘दृश्यम 3’ चं भरभरून कौतुक होत आहे. याउलट, मल्याळमच्या ‘दृश्यम 3’ ला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
मल्याळमच्या ‘दृश्यम 3’ सिनेमाची कथा आणि सस्पेन्स कमकुवत असल्याचं म्हटलं गेलं होतं. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांनी हिंदी सिनेमाच्या क्लायमॅक्सचं कौतुक करत तो मल्याळमपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजय देवगण याच्या सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘दृश्यम: द कन्क्लूजन’
‘दृश्यम: द कन्क्लूजन’ मध्ये अजय देवगणने विजय साळगावकरची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली. तब्बू मीरा देशमुखच्या भूमिकेत पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांनीही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यत मजल मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.