REVIEW : प्रेमाची नवी परिभाषा शिकवणारा ‘दे दे प्यार दे’

REVIEW : प्रेमाची नवी परिभाषा शिकवणारा 'दे दे प्यार दे'

मुंबई : प्रेमाला वयाचं बंधन नसतं‌, खरं प्रेम कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतं हे हलक्या फुलक्या पध्दतीनं सांगण्याचा प्रयत्न ‘दे दे प्यार दे’ या सिनेमात करण्यात आलायं. प्रेक्षकांना हसवणं ही एक कला असते. लेखक-दिग्दर्शक लव रंजननं प्रेक्षकांची ही नस चांगलीच ओळखली. त्याच्या ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनु के टीटु की स्वीटी’ या सिनेमांतून त्यानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा ‘दे दे प्यार दे’ या सिनेमात त्याने त्याचा हा यशस्वी फॉर्म्युला वापरला आहे. पण यंदा लव रंजन फक्त निर्मात्याच्या भूमिकेत असून दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने आकीव अलीवर सोपवली. आकीव मुळातच उत्तम एडीटर असल्यामुळे त्याने आपला दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा बोर होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

चित्रपटाची कथा लंडनमध्ये सुरु होते. 50 वर्षांच्या आशिष (अजय देवगण)ची ओळख 26 वर्षांच्या आयशा (रकुलप्रीत सिंग) सोबत एका पार्टीत होते. 15 वर्षांपासून आपला देश, बायको, मुलं सोडून परदेशात एकटं राहणाऱ्या आशिषला आयशाचा बिंधास्त, नटखट अंदाज भावतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो. आपली बायको मंजू (तब्बू) सोबत वेगळं झाल्यापासून एकटा पडलेल्या आशिषच्या आयुष्यात आयशा नवसंजीवनी आणते. पण आयशा आशिषच्या मुलीच्या वयाची असल्यामुळे तिला आपल्या घरचे स्वीकारतील का? हा प्रश्न आशिषला सतावतो. त्यामुळेच आपल्या कुटुंबियांशी ओळख करुन देण्यासाठी तो आयशाला हिमाचलमधील आपल्या घरी घेऊन जातो. तिथे गेल्यावर मात्र कथा वेगळंच वळण घेते. आता कथा काय वळण घेते?, आशिषच्या घरचे आयशाला स्वीकारतात का?, आशिष-आयशाचं नातं  मंजू स्वीकरते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल.

चित्रपटाचा विषय वेगळा आहे. गंभीर विषय सिनेमात हलक्या फुलक्या पध्दतीनं मांडण्यात आलायं.  चित्रपटाचा विषय तसा बोल्ड पठडीतला असल्यामुळे सिनेमात बोल्ड दृश्यांचा भडिमार करण्याची संधी होती; पण दिग्दर्शकानं या मोहात न पडता अचूक टायमिंग साधत उत्तम फॅमिली एन्टरटेनर सिनेमा बनवला आहे. चित्रपटातले काही वनलायनर पंच जबरदस्त आहेत.

अजय-तब्बू-रकुलप्रीतमधली केमिस्ट्री भन्नाट रंगली आहे. चित्रपट मध्यंतरापूर्वी फक्त आशिष आणि आयशाभोवती फिरत असल्यामुळे थोडा कंटाळवाणा झालाये. पण इतर पात्रांची एन्ट्री झाल्याबरोबर पुन्हा चित्रपटाची गाडी ट्रकवर येते. चित्रपटात कॉमेडीसोबतच इमोशन्सवरही भर देण्यात आला आहे. तसेच  फॅमिली व्हॅल्यूज पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. प्रेमाची नवी परीभाषा दिग्दर्शकानं या चित्रपटाद्वारे मांडली आहे. एवढं सगळं छान छान असून सुध्दा ठराविक वेळेनंतर चित्रपट थोडा ताणल्यासारखा वाटतो. काही दृश्य आणि गाणीही सिनेमात उगाच घुसवल्यासारखी वाटतात.

अजय गेल्या काहीवर्षांपासून गंभीर, विनोदी, अॅक्शन भूमिका करतो आहे. बऱ्याच वर्षांनी रोमॅण्टिक सिनेमात तो दिसला. या सिनेमातही आशिषच्या भूमिकेत तो फिट बसला आहे. तब्बू आणि रकुलच्यामध्ये फसल्यावरचे त्याचे एक्सप्रेशन तर भन्नाट. अजयच्या कॉमिक टायमिंगचा सिनेमात अजून वापर केला असता तर मजा आली असती. मंजू-फॅमिली की आय़शा या द्वंद्वामध्ये अडकलेला आशिष अजयने उत्तम साकारला आहे. तब्बू नेहमीप्रमाणेच बेस्ट. कॉमेडी असो वा इमोशनल सीन्स तिच्या मॅच्युअर एक्टिंगपुढे सगळेच फेल झालेत. क्यूट रकूल या सिनेमात प्रचंड हॉट दिसली. चुलबुली, बिंधास्त आयशा तिने उत्तम साकारली. तब्बूसोबतची तिची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. अलोक नाथ, जिमी शेरगील, जावेद जाफरीनेही छोट्या भूमिकांमध्ये मजा आणली.

चित्रपटाच्या संगीताने मात्र निराशा केली. ‘चले आना’ हे गाणं सोडलं तर एकही गाणं लक्षात राहत नाही. अरमान मलिकनं गायलेलं ‘चले आना’ हे गाणं मस्त जमून आलं. एकूणच काय तर चित्रपटात काही त्रुटी असल्या तरी वेगळा विषय, अजय-तब्बू-रकुलप्रीत सिंगच्या अभिनयाची जुगलबंदी बघण्यासाठी एकदा हा चित्रपट बघायला हरकत नाही.

‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय ‘तीन स्टार्स’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI