MALAAL REVIEW : प्रेक्षकांना होणार ‘मलाल’!

या सिनेमात अॅक्शन, लव्हस्टोरी, डान्स, कॉमेडी, इमोशन्स, संगीत असा सगळा मसाला ठासून भरला आहे. पण आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठुन येणार म्हणा. कारण हा सगळा डोलारा ही जोडी आपल्या खांद्यावर पेलू शकली नाही.

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:02 PM, 5 Jul 2019
MALAAL REVIEW : प्रेक्षकांना होणार ‘मलाल’!

कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : प्रेमाला कुठलीही परिभाषा नसते. प्रेम जात बघून केलं जात नाही. प्रेमाला वयाचंही बंधन नसतं. प्रेमाची हीच परिभाषा संजय लीला भन्साळींनी आपल्या प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या बाजूंनी मांडली. ‘मलाल’ या सिनेमातही त्यांनी अशीच एक प्रेमकहाणी गुंफण्याचा प्रयत्न केला. फरक फक्त एवढाच आहे की, यावेळेस भन्साळी निर्मात्याच्या खुर्चीत आहेत, तर मराठमोळा दिग्दर्शक मंगेश हडावळेनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 11 वर्षांपूर्वी आलेल्या ‘टींग्या’ या मराठी सिनेमात मंगेशनं दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यामुळे ‘मलाल’कडूनही अपेक्षा वाढल्या होत्या. पण हा सिनेमा मंगेशपेक्षा भन्साळींचाच सिनेमा जास्त वाटतो.

2004 साली आलेला तामिळ सिनेमा ‘7 जी रेनबो कॉलनी’चा ‘मलाल’ रिमेक आहे. संजय लीला भन्साळींची भाची शर्मिन सेहगल आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरीला या सिनेमाव्दारे लॉच करण्यात आलं आहे. त्यामुळेच या सिनेमात अॅक्शन, लव्हस्टोरी, डान्स, कॉमेडी, इमोशन्स, संगीत असा सगळा मसाला ठासून भरला आहे. पण आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठुन येणार म्हणा. कारण हा सगळा डोलारा ही जोडी आपल्या खांद्यावर पेलू शकली नाही. ‘मलाल’चा अर्थ दु:ख, पश्चाताप. हा सिनेमा बघितल्यावर तुम्हालाही ‘मलाल’ होईल की, आपण हा सिनेमा का बघितला.

मुंबईतील आंबेवाडी चाळीत राहणारा शिवा (मिजान) दिवसभर आपल्या मित्रांसोबत उनाडक्या करत फिरत असतो. एकदिवस वाईट परिस्थीती ओढवल्यामुळे आस्था त्रिपाठी ( शर्मिन) आपल्या कुटुंबासोबत या चाळीत शिफ्ट होते. सीएचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत आलेली आस्था शिवाच्या प्रेमात पडते. शिव महाराष्ट्रीयन तर शर्मिन उत्तर भारतीय त्यामुळे दोघांचं कुटुंब त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. आता एकमेकांचं प्रेम मिळवण्यासाठी हे दोघं काय पाऊल उचलतात हे बघण्यासाठी तुम्हाला ‘मलाल’ बघावा लागेल.

तसं बघायला गेलं तर ‘मलाल’च्या कथेत कुठलंही नाविन्य नाही. या कथेला मराठी-अमराठीचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 90च्या दशकातील मुंबईची गोष्ट सागणाऱ्या मलालचा हिरो शिवा अस्सल मुंबईकर आहे. शिवामध्ये बऱ्याचदा एन चंद्रांच्या ‘तेजाब’ सिनेमातील मुन्ना तर कधी रामगोपाल वर्माच्या ‘रंगीला’मधील मुन्ना डोकावत राहतो.

भन्साळींच्या इतर सिनेमासारखे या सिनेमात जरी भव्य सेट नसले, तरी सिनेमातील दोन्ही पात्रांना त्यांनी या सिनेमात मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात चाळीतलं वातावरण उत्तम उभारण्यात आलं आहे. शिवा आणि आस्था ही पात्र नक्कीच मुंबईच्या चाळीत आजही दिसतील. 90च्या दशकातील चाळीतलं वातावरण दिग्दर्शकानं उत्तम दाखवलं आहे. याचं श्रेय सिनेमॅटोग्राफर रागुलला जातं. त्याच्या अप्रतिम सिनेमॅटोग्राफीमुळे चाळीतलं वातावरण उत्तम उभं राहिलं. हा सिनेमा 90च्या दशकात घडतोय हे दाखवण्यासाठी त्या दशकातील ‘टायटॅनिक’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या दोन सिनेमांचाही प्रतिकात्मकरित्या वापर करण्यात आला आहे. एवढं सगळं असलं तरी ‘मलाल’ बघतांना हवी तशी मजा येत नाही. बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा विस्कळीत वाटतो. तर बऱ्याच ठिकाणी रेंगाळलेला वाटतो. कथेत कुठलंही नाविन्य नसल्यामुळे पुढे काय होणार याची प्रचिती तुम्हाला येत राहते.

मिजान आणि शर्मिनचा हा पहिलाच सिनेमा. दोघांनाही अजून बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. मिजान कॅमेऱ्यासमोर अजून कम्फर्टेबल दिसत नाही. बऱ्याच सीनमध्ये त्याने प्रभावी केलं असलं, तरी त्याला अजून बऱ्याच बारकाव्यांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. डान्स करता आला, पिळदार शरीरयष्टी कमावली, थोडीफार अॅक्शन केली म्हणजे झालो बाबा एकदाचं हिरो या समजातून बाहेर पडून मिजानला त्याच्या कमकुवत बाबीवर मेहनत घेण्याची खऱंच गरज आहे. मिजानच्या तुलनेत शर्मिन बरीच मागे आहे. बऱ्याच प्रसंगात तर तिची संवादफेकही खटकते. अनन्या पांडे, तारा सुतारिया, दीक्षा पटानी, कियारा अडवाणी या सगळ्या नव्या अभिनेत्रींना काटे की टक्कर द्यायची असेल, तर शर्मिनला कसून तयारी करावी लागणार आहे. अन्य़था ती वन फिल्म वंडर बनून राहिली तर नवल वाटायला नको. राजकारण्याच्या छोट्या भूमिकेत समीर धर्माधिकारीनं मात्र प्रभावी काम केलं आहे. सिनेमाचं संगीतही अजिबात प्रभावी करत नाही. भन्साळींच्या सिनेमाचं संगीत नेहमीच उजवं असतं. पण या सिनेमातील एकही गाणं लक्षात राहत नाही.

एकूणच काय तर संजय लीला भन्साळींची निर्मिती, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी असूनही सिनेमातील प्रमुख जोडीचा प्रभाव न पडल्यामुळे ‘मलाल’ निराश करतो. चेहऱ्यावर एकचं भाव घेऊन मोठ्या पडद्यावर वावरणाही ही जोडी बघून तुम्हाला ‘मलाल’ वाटेल. या सिनेमाला ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी देतोय दीड स्टार…

VIDEO :