रिव्ह्यू : ‘नाळ’ – आई आणि मुलाच्या नात्यातली

रिव्ह्यू : 'नाळ' - आई आणि मुलाच्या नात्यातली

आई आणि मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे नाळ… खेडेगावात म्हातारी आई, बायको आणि छोट्या मुलासह राहाणारं सावकार कुटुंब यांच्याभोवतीच सिनेमाची कथा फिरते. 8-9 वर्षांचा असणाऱ्या चैत्याचं (श्रीनीवास पोकळे) खेळण्या बागडण्याचं वय… मित्रांसोबत मस्ती करणं, नदीत पोहायला जाणं अशा उनाडक्या सुरू असतात…पण त्याच्या आईला मात्र पोरांसारखा अभ्यास करावा, शिकावं असं वाटतं असतं.

एकदा खेळत असताना चैत्याला त्याचा मामा भेटतो आणि मामाकडून त्याला समजतं की आपण जिच्यासोबत राहतो, ती आपली खरी आई नाही, आपली खरी आई दुसरीच आहे… आपल्याला दत्तक घेतलंय… तेव्हापासून तो रहाणाऱ्या आईसोबत तुसडेपणाने वागतो, चिडचीड करतो, त्रास देतो, त्याच्या या लहान वयातसुध्दा त्याच्या वागण्यातून या गोष्टी दिसून येतात… तो ठरवतो की काही झालं तरी चालेल पण आपण आपल्या खऱ्या आईला भेटायचंच…

आईकडे जाण्यासाठी तो काय काय करतो, एवढं होऊनही त्याची खरी आई त्याला भेटते का? या सगळ्यांची उत्तरं मिळण्यासाठी नाळ सिनेमा नक्कीच पहावा लागेल… कथेचा विषय जरी खुप छोटा असला तरी तो मोठ्या सिनेमात पडद्यावर आणायला दिग्दर्शकाला यश आलंय… म्हैस, कोंबड्या या ग्रामीण भागात असणाऱ्या घरच्या गोष्टी… पण त्यांच्या माध्यमातूनही कथेला साजेल अशा अनेक symbolical गोष्टी दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवलेल्या आहेत…

अभिनय आणि छायाचित्रण या चित्रपटाच्या अधिक जमेच्या बाजू आहेत. मुळात कथा ही जास्तीत जास्त तीन पात्रांभोवतीच फिरते. त्यातील चैत्राची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार श्रीनीवास पोकळेच्या अभिनयाला तोड नाही. खास करून त्याची असणारी वऱ्हाडी भाषा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.

चैतन्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या देविका दफ्तरदार असतील किंवा वडिलांची भूमिका साकरणारे नागराज मंजुळे असतील… यांचा अभिनय चांगलाच… फक्त आई-वडील आणि मुलाच्या भाषेत मात्र कुठतरी विभीन्नता जाणवते असं चित्रपट पहाताना सतत वाटत राहतं.

सैराट, देऊळ यांसारख्या चित्रपटांचं चित्रीकरण करणाऱ्या सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी चित्रीकरणासोबतच पहिल्या दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे पार पाडलीय… फँड्री, सैराटसारखे यशस्वी सिनेमे प्रेक्षकांना दिलेल्या नागराज मंजुळेंनी चित्रपटाचे संवाद लिहिलेले आहेत… त्यामुळे संवादात देखील ग्रामीण भाषेची नाळ जुळलेली दिसते… “आई मला खेळायला जायचयं” हे चित्रपटात असणारं एकमेव गाणं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतं.

एकंदरीतच आई आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगत सांगत प्रेक्षकांशी नाळ जुळवून ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. पण ती जुळतेय का हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच ठरवावं लागेल…

प्रमोद जगताप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI