Smile Please Review : जगण्याची नवी दिशा देणारा ‘स्माईल प्लीज’

निवडणूकीचा धुराळा संपला, वर्ल्ड कप संपला त्यामुळे आता ‘मौके पे चौका’ मारत विक्रमनं प्रेक्षकांना 'स्माईल प्लीज'ची साद घातली आहे. विक्रमच्या 'हृदयांतर' आणि ‘स्माईल प्लीज’ या दोन्ही सिनेमांमध्ये मानवी नातेसंबंधावर टाकलेला प्रकाश हा या दोन्ही सिनेमांचा समान धागा आहे.

Smile Please Review : जगण्याची नवी दिशा देणारा 'स्माईल प्लीज'
Nupur Chilkulwar

|

Jul 19, 2019 | 2:37 PM

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीसनं ‘हृदयांतर’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून मराठीत पदार्पण केलं. वेगळा विषय आणि उत्तम सादरीकरण यामुळे या सिनेमानं भर पावसातही प्रेक्षकांचं ‘ह्रदयांतर’ करत प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत येण्यास भाग पाडलं. त्यामुळे विक्रमच्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाकडून सगळ्यांनाच अपेक्षा होत्या. निवडणूकीचा धुराळा संपला, वर्ल्ड कप संपला त्यामुळे आता ‘मौके पे चौका’ मारत विक्रमनं प्रेक्षकांना ‘स्माईल प्लीज’ची साद घातली आहे. विक्रमच्या ‘हृदयांतर’ आणि ‘स्माईल प्लीज’ या दोन्ही सिनेमांमध्ये मानवी नातेसंबंधावर टाकलेला प्रकाश हा या दोन्ही सिनेमांचा समान धागा. पण, यावेळेस मात्र विक्रमचा हा प्रयोग हवा तसा रंगलेला नाही. चित्रपटाचा विषय चांगला होता, चित्रपटातील कलाकारही तगडे होते, पण तरीही अपेक्षित परिणाम हा चित्रपट साधत नाही.

चित्रपटाच्या कथेत नाविन्य आहे. पण, सादरीकरण फारसं प्रभावी नसल्यामुळे ती कथा तुमच्या काळजाला हात घालण्यात पाहिजे तशी यशस्वी ठरत नाही. नंदिनी जोशी (मुक्ता बर्वे) प्रसिध्द फोटोग्राफर. आपल्या कामाप्रती महत्त्वाकांक्षी असलेल्या नंदिनीच्या आयुष्यात मात्र सगळं काही आलबेल नसतं. प्रसिध्द दिग्दर्शक शिशिर (प्रसाद ओक)सोबत घटस्फोट झालेली नंदिनी आपल्या वडिलांसोबत (सतीश आळेकर) राहत असते. नंदिनीची मुलगी नुपूर (वेदश्री महाजन) ही आपल्या वडिलांसोबतच राहत असते. आपल्या आईचं आपल्याकडे नीट लक्ष नाही, या भावनेतून नुपूरच्या मनात आपल्या आईबद्दल आकस असतो. त्यामुळे नंदिनीसोबत नुपूरचं अजिबात पटत नाही. हीच गोष्ट नंदिनीला सारखी सलत असते. त्यामुळे यशस्वी असूनही नंदिनी व्यक्तिगत आयुष्यात मात्र सतत तणावाखाली असते.

नंदिनीला डिमेंशिया (स्मृतिभ्रशं) झाल्याचं तिची मानसोपचारतज्ञ मैत्रीण डॉक्टर अंजली सांगते आणि नंदिनी पूर्णपणे कोसळते. या गंभीर आजारामुळे नंदिनीला खूप जपावं लागतं. स्वत:चा आत्मविश्वास ती हरवून बसलेली असते. या कठीण समयी नंदिनीच्या आयुष्यात विराज (ललित प्रभाकर)ची एन्ट्री होते आणि तिचं पूर्ण आयुष्यचं बदलतं. आता विराज नेमका कोण असतो? नंदिनी आजारातून बरी होते का? नंदिनीचं वैयक्तिक आयुष्य स्थिर होतं का? तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमलतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा सिनेमा बघितल्यावर मिळतील.

चित्रपटाचा विषय खरंच चांगला आहे. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं हे भीषण वास्तव सिनेमात दाखवण्यात आलं आहे. विक्रम फडणीस आणि इरावती कर्णिकने जर थोडी अजून पटकथेवर मेहनत घेतली असती तर हा विषय खरंच मनाला भिडला असता.

सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच सिनेमात विषयाला हात घालण्यात आला. पण मध्यंतरापूर्वी सिनेमा एकाच रेषेत सुरु असतो. काही घटनाच सिनेमात घडत नाही. सिनेमाची गती ही स्लो आहे. मध्यंतरानंतर सिनेमा वेग पकडतो, मात्र बऱ्याच ठिकाणी लांबलेला वाटतो. काही प्रसंग अनाकलनीय वाटतात. विशेष म्हणजे विराज हे पात्र का येतं? त्याची अनोळख्या नंदिनीशी, नंदिनीच्या मुलीशी लगेचच इमोशनली नाळ कशी जुडते? या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत राहतो. या काही त्रुटी सोडल्या तर कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या बळावर सिनेमाला चांगलंच तारलं आहे. नंदिनीचा ट्रॅक सुरु असताना पालकांच फक्त आपलं करिअर उंचीवर नेण्यासाठी आपल्या मुलांकडे कसं दुर्लक्ष होतं, हे ही सिनेमातून सांगण्यात आलं आहे.

विक्रम फडणीसचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा. पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे या सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. विक्रमनेही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरं उतरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. विक्रमने आपल्या स्टाईलनुसार चित्रपट लॅव्हिश आणि कलरफुल केला. मुक्ता बर्वेने पुन्हा एकदा आपण काय ताकदीची अभिनेत्री आहोत हे सिध्द केलं. तिने नंदिनीच्या आयुष्यातील विविध छटा उत्तम रंगवल्या आहेत. ललित प्रभाकरनेही सिनेमात कमाल केली आहे. त्याची एन्ट्री सिनेमात मध्यंतरानंतर झाली. पण तरीही तो भाव खाऊन गेला आहे. वेदश्री महाजन नुपूरच्या पात्रात उगाच लाऊड दाखवली आहे. आदिती गोवित्रीकरची भूमिका छोटी असल्यामुळे तिच्या वाट्याला विशेष काही नाही. प्रसाद ओकनेही त्याची भूमिका उत्तम वठवली. या सगळ्यांमध्ये विशेष उल्लेख करावा लागेल अप्पांच्या भूमिकेतील सतीश आळेकरांचा. बऱ्याच प्रसंगांमध्ये ते केवळ नजरेतून बोलले आहेत. मुक्ता बर्वेसोबतच्या इमोशनल सीन्समध्ये त्यांनी कमाल केली आहे.

मिलिंद जोगची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. रोहन-रोहनने संगीताची बाजूही उत्तम सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘चल पुढे’ हे गाणं मस्त जमून आलं आहे. तब्बल 32 कलाकार या गाण्यात दिसलेत. एकूणच काय तर जगण्याची नवी दिशा देणारा ‘स्माईल प्लीज’ जर पटकथेवर मेहनत घेतली असती तर अजून चांगला झाला असता. टीव्ही नाईन मराठीकडून मी या सिनेमाला देतोय ‘तीन स्टार्स’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें