प्रेरित करणारा ‘सुपर 30’

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. खऱ्या आयुष्यातील हिरोचं आयुष्य मोठ्या पडद्यावर बघणं नेहमीच रसिकांना आवडतं.

प्रेरित करणारा 'सुपर 30'

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. खऱ्या आयुष्यातील हिरोचं आयुष्य मोठ्या पडद्यावर बघणं नेहमीच रसिकांना आवडतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर सगळ्याच बायोपिकनं बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. कधीच प्रकाशझोतात नसलेल्या खऱ्या हिरोंची गोष्ट नेहमीच प्रेरणादायी असते. या प्रेरणादायी गोष्टींमुळे समाजातही बऱ्याचदा अनेक बदल झालेत. हृतिक रोशनची प्रमुख भुमिका असलेला आणि विकास बहल दिग्दर्शित ‘सुपर 30’ हा चित्रपटही गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. विकास बहल आणि हृतिक रोशन या जोडीने ज्यापध्दतीनं हा सिनेमा हाताळला आहे ते खऱंच लाजवाब. हृतिकच्या दमदार अभिनयामुळे या सिनेमानं वेगळीच उंची गाठलीये. ‘सुपर 30’ बिहारच्या अशा द्रोणाचाऱ्याची कथा आहे ज्याने अर्जुनाला नाही तर एकलव्याला महान बनवलं.

आनंद कुमारने पटनातील अनेक गरीब मुलांचे मोफत कोचिंग क्लास घेऊन त्यांना आयआयटीत प्रवेश मिळवून दिला होता. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या महत्त्वाकांक्षांना केराची टोपली दाखवली होती. एवढच काय तर आपल्या प्रेमाचंही बलिदान दिलं होतं. सिनेमाची सुरुवात फ्लॅशबॅकमध्ये होते. आनंद कुमार(हृतिक रोशन) ला कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेण्याची संधी मिळते, पण हलाखीच्या परिस्थितीमुळे आंनदला या संधीवर पाणी सोडावे लागते. गरीबीमुळे आपल्याला अमेरिकेला जाता न आल्याची सल आनंदच्या मनात घर करुन राहते. त्याची प्रेयसी रितू (मृणाल ठाकूर) पण या कठीण काळात आनंदची साथ सोडते. या सगळ्या खडतर काळात आनंदला लल्लन (आदित्य श्रीवास्तव) जी भेटतात. लल्लन आनंदला आपल्या कोचिंग क्लासचा ‘स्टार टीचर’ बनवतो. अचानक पैसा आल्यामुळे आनंदची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलते. पण एक दिवस त्याला आपण फक्त श्रीमंतांच्या मुलांचंच भवितव्य बनवत असल्याची जाणीव होते. त्यांतनंतर मात्र आनंद कुमारचं ध्येय बदलतं आणि मग सुरु होतो ‘सुपर 30’चा झपाटलेला प्रवास. आता आनंद त्या 30 मुलांना कसं शिक्षण देतो? त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? हा सगळा झपाटलेला प्रवास कसा होतो ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘सुपर 30’ बघावा लागेल.

सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक विकास बहलनं सिनेमाला इमोशन्स, कॉमेडी आणि वास्तववादीपणाचा असा काही तडका दिलाय की तुम्ही लवकर या विश्वातून बाहेर निघू शकत नाही. चित्रपटातील एक एक दृश्य आनंद कुमार यांच्या जीवनाचं कटू सत्य सांगतं. त्यांचा संघर्ष सांगतं. चित्रपटाचा फर्स्ट हाफ भन्नाट झालाय. मध्यंतरानंतर मात्र दिग्दर्शकाची सिनेमावरील पकड सुटलीय. सिनेमाची कथा मध्यंतरानंतर मेलोड्रॅमेटिक होते. सिनेमाचे काही प्रसंग खुपच नाटकी वाटतात. त्यामुळे वेगळ्या उंचीवर गेलेला हा सिनेमा शेवट येईपर्यंत अपेक्षित उंची टिकवून ठेऊ शकत नाही. आनंद कुमार यांच्या आयुष्यातील विवादित प्रसंगांवर सिनेमात हात घालण्यात आलेला नाही त्यामुळे सिनेमा संपतांना त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत राहतात. सिनेमात गरीबी, लाचारी, भुक अशा अवस्थेतही मुलांची आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द इमोशनल पध्दतीनं गुंफण्यात आलीये. राजा का बेटा राजा नही रहेगा, आपत्ती से आविष्कार का जन्म होता है सारखे संवाद रसिकांना टाळ्या-शिट्ट्या वाजवायला भाग पाडतात.

हृतिक रोशनला भारतीय सिनेमाचा ग्रीक गॉड म्हंटंल जातं. हृतिकला या सिनेमात डी ग्लॅम लूकमध्ये प्रेझेंट करण्यात आलंय. हृतिकच्या उच्चारांमध्ये कुठेकुठे बिहारी भाषेचा दोष जाणवतो, पण त्याच्या दमदार अभिनयानं ही कमकुवत बाजू झाकली आहे. सिनेमात हृतिक आनंद कुमारचं आयुष्य अक्षरक्ष: जगलाय. हृतिकचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हृतिकसोबतच 30 मुलांनीही सिनेमात भन्नाट काम केलंय. मृणाल ठाकूर छोट्या भूमिकेत लक्षात राहते. नंदिश सिंह, पंकज त्रिपाठी, वीरेंद्र सक्सेना,अमित साद, आदित्य श्रीवास्तव सगळ्यांनीच सिनेमात लक्षणीय कामं केली आहेत.

संगीत ही सिनेमाची कमकुवत बाजू आहे. उदित नारायण आणि श्रेया घोषालच्या आवाजातील ‘जुगरफिया’ हे गाणं सोडलं तर सिनेमातील एकही गाणं लक्षात राहत नाही. सिनेमाच्या शेवटी क्रेडिट लाईनमध्ये नाव दिसल्यावर आपल्याला कळतं की सिनेमाला अजय-अतुलनं संगीत दिलंय. एकूणच काय तर स्वप्नांचा पाठलाग केला तर नक्कीच ते ध्येय आपण गाठू शकतो हे या सिनेमातून दाखवण्यात आलंय. आनंद कुमार यांच्या प्रेरित करणाऱ्या चरित्रपटाला ‘टीव्ही नाईन मराठी’ कडून मी देतोय तीन स्टार्स.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI