अखेर मराठमोळ्या अभिनेत्रीला मागावी लागली माफी; बिपाशाची उडवली होती खिल्ली

अभिनेत्री बिपाशा बासूच्या दिसण्यावरून टिप्पणी करणं या मराठमोळ्या अभिनेत्रीला महागात पडलं आहे. ट्रोलिंगनंतर तिला अखेर जाहीर माफी मागावी लागली आहे. बिपाशा पुरुषी दिसते, अशी कमेंट तिने एका मुलाखतीत केली होती.

अखेर मराठमोळ्या अभिनेत्रीला मागावी लागली माफी; बिपाशाची उडवली होती खिल्ली
Bipasha Basu
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 15, 2025 | 12:44 PM

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि त्यावर नेटकरी कशा प्रतिक्रिया देतील, याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री बिपाशा बासूच्या दिसण्यावरून आणि फिगरवरून टिप्पणी करताना दिसली. बिपाशाबद्दल मृणालने वापरलेली भाषा नेटकऱ्यांना अजिबात आवडली आणि त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. खुद्द बिपाशानेही नाव न घेता तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. या ट्रोलिंगनंतर आता मृणालने माफी मागितली आहे.

मृणालने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, ’19 व्या वर्षांची मी किशोरवयीन असताना अनेक मूर्खपणाच्या गोष्टी म्हटल्या होत्या. माझ्या आवाजाचं वजन किती असेल किंवा सहज, मस्करीत म्हटलेले शब्दही कोणाला किती दुखावू शकतात, हे मला नेहमीच समजत नव्हतं. पण असं झालंय आणि त्यामुळे मी मनापासून माफी मागते. माझा उद्देश कोणालाही बॉडीशेम (दिसण्यावरून टीका करण्याचा) करण्याचा नव्हता. मुलाखतीत केलेली ती एक मस्करी होती, जी खूप महागात पडली आहे. पण ते समोर कसं आलं हे मला समजलंय आणि मी माझे शब्द खूप विचारपूर्वक वापरायला हवे होते, असं मला वाटतंय. काळानुसार, मला ही गोष्ट समजली आहे की सौंदर्य हे प्रत्येक रुपातून समोर येत असतं आणि त्याचं मूल्य मला आता खूप चांगल्या पद्धतीने कळलं आहे.’

व्हायरल व्हिडीओमध्ये मृणालसोबत एक व्यक्ती बसलेली आहे आणि ती बिपाशाचं कौतुक करत असते. त्यावर मृणाल त्याला म्हणते, “मी बिपाशापेक्षा चांगली आहे. तुला अशा मुलीशी लग्न करायचंय का, जी पुरुषी दिसते आणि तिचे मसल्स असतील? जा तू बिपाशा बासूशी लग्न कर. मी तिच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगली आहे.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर बिपाशानेही अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.

‘सशक्त महिला एकमेकींना सहाय्य करतात आणि वर नेतात. सुंदर महिलांनी त्यांचे स्नायू बळकट करण्याची आवश्यकता आहे. आपण मजबूत असायला हवं. बळकट स्नायूमुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. महिलांनी मजबूत किंवा बळकट दिसू नये, या जुन्या विचाराला मोडून टाका. महिलांनी शारीरिकदृष्ट्या नाजूकच असायला हवं, हा अत्यंत जुना विचार आहे’, अशा आशयाची पोस्ट बिपाशाने शेअर केली होती.