वादानंतर ‘मनाचे श्लोक’बद्दल मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय; नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया

समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे या चित्रपटावरून वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वादानंतर मनाचे श्लोकबद्दल मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय; नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया
Mrunmayee Deshpande
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2025 | 12:44 PM

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. ‘मनाचे श्लोक’ हे चित्रपटाचं नाव धार्मिक भावना दुखावणारं आहे. मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी लिहिलेलं एक अध्यात्मिक पुस्तक असून मृण्मयीच्या चित्रपटाची कता मात्र लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या वादग्रस्त विषयांवर आहे. त्यामुळेच या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या चित्रपटाचे राज्यभरातील अनेक शोज बंद पाडण्यात आले आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर आता मृण्मयीने मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली.

मृण्मयी देशपांडेची पोस्ट-

‘मनाचे श्लोक’ या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय दु:खद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि चित्रपटाच्या नवीन नावासह येत्या गुरुवात दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत,’ अशी माहिती मृण्मयीने दिली.

मृण्यमीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहेत. ‘तसं बघायला गेलं तर एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचतो, हे सिद्ध झालंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘चित्रपटाचं नाव बदलण्याची काही गरज नव्हती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘काही दिवसांपूर्वी रामदासांच्या जीवनावर एक चित्रपट आला, तो बेकार आपटला. आता जी लोकं या चित्रपटाच्या शीर्षकाला विरोध करत आहेत, त्यांनी किमान जरी तो चित्रपट बघितला असता तर तो ही चालला असता. भक्तांची निष्ठा दाखवायची जागा चुकतेय, हे त्यांना कळायला हवं’, असं मत एका नेटकऱ्याने मांडलंय.

‘आज मनाचे श्लोक, उद्या ज्ञानेश्वरी म्हणून पिक्चर काढतील आणि त्यात गौतमी पाटीलला नाचवतील, या लोकांचा काही भरोसा नाही’, अशी टीका एकाने केली. ‘अतिशय दुःखद बाब आहे. हल्ली या लोकांच्या भावना इतक्या स्वस्त झाल्या आहेत की ज्यात त्यात दुखावल्या जातात सतत. खरं तर विरोध करणाऱ्या लोकांना मनाचे श्लोक, रामदास स्वामी याच्याशी काही देणं घेणं नाहीये. एकही श्लोक पाठ नसेल किंवा त्याचा अर्थ समजणं तर दूरच राहिलं. या लोकांना फक्त गुंडागर्दी, दादागिरी करण्यात रस असतो. त्यामुळे यांच्या दबावाला बळी पडून नाव बदलायला नको होतं. ही अशीच माणसं तालिबान तयार करत असतात, कारण ती विवेकशून्य असतात’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी मतं मांडली आहेत.