रेमो डिसूझाकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी; या गँगस्टरला अटक

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गँगस्टरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलं असता या गँगस्टरला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेमो डिसूझाकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी; या गँगस्टरला अटक
Remo D'Souza
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2026 | 8:36 AM

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणविरोधी पथकाने गुरुवारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीला अनेकदा धमक्यांचे फोन करून खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक केली. याप्रकरणी पुजारीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. देश सोडून गेल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी 2020 मध्ये रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल इथून प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. तेव्हापासून तो विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. या प्रकरणी खंडणविरोधी पथकाने मार्च 2018 मध्येही दोन आरोपींना अटक केली होती. यामध्ये चित्रपट निर्माता सत्येंद्र त्यागीचाही समावेश होता. त्यागी हा दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा बिझनेस पार्टनरसुद्धा होता. चित्रपटाशी संबंधित आर्थिक वाद मिटवण्यासाठी त्यागीने गँगस्टर पुजारीची मदत घेतल्याचा आरोप रेमोने केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमो डिसूझाची पत्नी लिझेलने मार्च 2018 मध्ये आंबोली पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आलं. रवी पुजारीने त्यांना खंडणीसाठी फोन केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सत्येंद्र त्यागीला दिल्लीतून अटक करण्यात आली आणि त्याच्या चौकशीच्या आधारे त्याचा साथीदार कमलसिंह विजयसिंह राजपूत उर्फ राजू यालाही अटक करण्यात आली. त्यावेळी रवी पुजारीला फरार आरोपी म्हणून दाखवण्यात आलं होतं.

रेमो डिसूझा आणि सत्येंद्र त्यागी यांनी 2014 मध्ये ‘डेथ ऑफ अमर’ नावाच्या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती केली होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तो सेन्सॉर बोर्डातच अडकून पडला आहे. त्यानंतर काही व्यावसायिक कारणांवरून रेमो आणि त्यागी यांच्यात वाद निर्माण झाला. तेव्हापासून त्यागीने रेमोकडे चित्रपटासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) किंवा चित्रपटात गुंतवलेले पैसे परत करण्याची मागणी सुरुवात केली. आपले वैसे वसूल करण्यासाठी त्यागीने गँगस्टर रवी पुजारीशी संपर्क साधला होता. त्यागीच्या वतीने पुजारीने ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान रेमो आणि त्याच्या पत्नीला अनेक धमक्यांचे फोन केले. पुजारीने त्याला त्यागीला एनओसी देण्यासाठी आणि त्याचसोबत 50 लाख रुपये खंडणी देण्यासाठी धमकावलं होतं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

2017 मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं त्यागीने रेमो डिसूझाविरोधात एफआयर दाखल केला होता. डिसूझाच्या सांगण्यावरून दुसऱ्या एका गुंडाकडून धमकीचे फोन येत असल्याचा दावा त्याने केला होता. त्यावेळी त्यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता रवी पुजारीला अटक केल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.