
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणीही विशेषाधिकार सांगू शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला. न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिल्यामुळे शुक्रवारी चित्रपटाचा प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज 31 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. याप्रकरणी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी’ने स्वामित्व हक्कांचं उल्लंघन झाल्याच आरोप करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने कंपनीची याचिका फेटाळून लावली.
हा चित्रपट पूर्णपणे नवीन आहे आणि तो आधीच्या चित्रपटाचं अनुकरण नाही. मराठी चित्रपटांचे सुज्ञ आणि रुचीपूर्ण प्रेक्षक या चित्रपटाच्या शीर्षकासह कंपनीने केलेले आरोप किंवा अन्य कोणत्याही कारणाने गोंधळून जाणारे नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. दोन्ही चित्रपटांच्या पटकथेतील स्वामित्व उल्लंघनाचे कंपनीचे आरोप असमर्थनीय आणि निराधार आहेत. तसंच कंपनीने शेवटच्या क्षणाला न्यायालयात धाव घेऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगितीची मागणी केली आहे. ती मान्य केली जाऊ शकत नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
“पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सीक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा चित्रपट पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे,” असं त्यांनी म्हटलंय. बंधनकारक कराराचं उल्लंघन, कॉपीराइट्सचं उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप मांजरेकरांवर करण्यात आले होते.
”पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामागचा आमचा हेतू एकच आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय आणि संपूर्ण प्रामाणिकपणे सुरू राहील. कारण, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत ते संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.