समंथाच्या बाळाच्या जन्माची चर्चा सुरू असतानाच नाग चैतन्यचं पत्नीबद्दल वक्तव्य; म्हणाला..
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने पती राज निदिमोरूसोबत पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. तिच्या बाळाच्या जन्माची चर्चा सुरू असतानाच अभिनेता नाग चैतन्यने पत्नी शोभिता धुलिपालाचं कौतुक केलं आहे. शोभिताचा नेमका कोणता गुण त्याला सर्वाधिक आवडतो, याचा खुलासा त्याने केला.

दाक्षिणात्य मनोरंजनविश्वातील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. समंथाने पती आणि चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी समंथाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव देव निदिमोरू असं ठेवण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर आता तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता नाग चैतन्य याचीही चर्चा होत आहे. त्याने नुकतंच पत्नी शोभिता धुलिपालाबद्दल मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नाग चैतन्य सध्या त्याच्या आगामी ‘वृषकर्मा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनेस्ट टाउनहॉल’ या कार्यक्रमात त्याने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने त्याला पत्नी शोभिताचा असा कोणता गुण आहे, जो त्याला सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न विचारला. त्यावर नाग चैतन्यने शोभिताच्या स्वभावाचं भरभरून कौतुक केलं. नाग चैतन्य म्हणाला, शोभितामध्ये अनेक चांगले गुण आहेत. मात्र, तिचा उत्साही आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा स्वभाव त्याला सर्वाधिक आवडतो. ती संस्कृती आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम आहे. तिला नेहमी काहीतरी नवीन जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची इच्छा असते, असं त्याने सांगितलं.
‘तिच्यामुळे मीही बदललो…’, नाग चैतन्यचा खुलासा
शोभिताच्या स्वभावाचं उदाहरण देताना नाग चैतन्यने त्यांच्या फिरण्याच्या सवयीविषयी एक मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला की, सुट्टीवर जाताना त्याचं सगळं नियोजन आधीच ठरलेलं असतं. मात्र, ठरल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर तो गोंधळून जातो. अशा वेळी शोभिता परिस्थिती समजून घेते आणि पुढाकार घेऊन दुसरा मार्ग शोधते. तिच्या या स्वभावामुळे त्यालाही अनेक नवीन गोष्टी अनुभवता आल्या. तिच्याकडून आपण उत्स्फूर्तपणे निर्णय घेण्यास शिकलो, असंही त्याने सांगितलं. याच कार्यक्रमातील रॅपिड फायर राऊंडमध्ये नाग चैतन्यला पत्नीचं वर्णन एका शब्दात करण्यास सांगण्यात आलं. त्यावर त्याने ‘प्रेम’ असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराचीही सध्या चर्चा होत आहे.
नाग चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ऑगस्ट 2024 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. याआधी नाग चैतन्यने अभिनेत्री समंथासोबत 2017 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता समंथा राज निदिमोरूसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आई झाली आहे, तर नाग चैतन्य शोभितासोबतच्या संसारातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत आहे.