Nana Patekar: आंदोलनाला न गेल्यामुळे नाना पाटेकरांनी मागितलेली अभिजीत दिपके यांची माफी? व्हिडीओमागचं सत्य समोर

Nana Patekar: दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिजीत नावाच्या व्यक्तीची माफी मागताना दिसत आहेत. त्याचा संबंध नेटकऱ्यांनी अभिजीत दिपके यांच्याशी जोडला आहे.

Nana Patekar: आंदोलनाला न गेल्यामुळे नाना पाटेकरांनी मागितलेली अभिजीत दिपके यांची माफी? व्हिडीओमागचं सत्य समोर
नाना पाटेकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2026 | 8:46 AM

Nana Patekar: सोशल मीडियावर सध्या दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर एका व्यक्तीची माफी मागताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्याशी जोडला जात आहे. अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाना पाटेकर येणार होते; मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितल्याचा दावा केला जात आहे. पण या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काही वेगळंच आहे. फॅक्ट चेकमध्ये या दाव्याची सत्यता समोर आली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. व्हिडीओमध्ये नाना एका अभिजीत नावाच्या व्यक्तीला संबोधित करत आहेत. एका कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करताना दिसतात. या व्हिडीओसोबत अभिजीत दीपके यांचा फोटो वापरण्यात आला. त्यामुळे अनेकांना नाना पाटेकर यांनी दीपके यांचीच माफी मागितल्याचं वाटलं. काही पोस्टमध्ये नाना आंदोलनात सहभागी होणार होते, असाही दावा करण्यात आला. फॅक्टली आणि आज तकच्या फॅक्ट चेकनुसार, या व्हिडीओचा अभिजीत दीपके यांच्याशी काहीच संबंध नाही.

Loading...

व्हायरल पोस्ट-

नाना पाटेकरांनी नेमकी कोणाची मागितली माफी?

या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर ज्या अभिजीत यांच्याशी संवाद साधत आहेत, ते मराठी चित्रपट निर्माते अभिजीत घोलप आहेत. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ’ या मराठी चित्रपटात नाना पाटेकर यांनी अभिनय केला होता, तर अभिजीत घोलप हे या चित्रपटाचे निर्माते होते. व्हिडीओमध्ये नाना पाटेकर ‘देऊळ’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला असल्याचं सांगतात. यावरून हा संदेश अभिजीत घोलप यांच्यासाठी असल्याचं स्पष्ट होतं. व्हिडीओमध्ये नाना यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचंही कौतुक केलं आहे.

फॅक्ट चेक-

अभिजीत घोलप यांनी 8 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. नाना पाटेकर हे NAFA अर्थात नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या मराठी चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्याच संदर्भात त्यांनी हा संदेश दिला होता. घोलप यांनी आपल्या पोस्टमध्ये नाना यांची महोत्सवात अनुपस्थिती खटकत असल्याचं नमूद केलं होतं. नाना यांनी पुढील वर्षी येण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. NAFA ही संस्था उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काम करते.

एखाद्या व्हिडीओसोबत वेगळ्या व्यक्तीचा फोटो किंवा चुकीचा संदर्भ जोडल्यास त्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. नाना पाटेकर यांच्या या व्हिडीओच्या बाबतीतही असंच घडलं आहे. अभिजीत घोलप यांच्यासाठी दिलेला संदेश अभिजीत दीपके यांच्याशी जोडण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक पोस्टवर त्वरित विश्वास ठेवण्याऐवजी मूळ पोस्ट, संबंधित व्यक्तींची माहिती आणि विश्वासार्ह फॅक्ट चेक तपासणं महत्त्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us