नानांनी 4 दशकं माहीममध्ये घालवली, मोलकरणीला आईसारखं वागवायचे, आवर्जून यायचे; शेजाऱ्यांनी काय सांगितलं?
मोठा स्टार झाल्यानंतरही नाना पाटेकर आपल्या बालपणीच्या परिसराशी जोडलेले राहिले. सणांच्या काळात ते सोसायटीत येत, मुलांसोबत क्रिकेट खेळत आणि रहिवाशांमध्ये मिसळत. शेजाऱ्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी गोव्यातील मणिपाल रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. पुण्यातील डोणजे गावामध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नानांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांसह त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली आहे. नाना पाटेकरांनी आपल्या आयुष्यातील जवळपास ४ दशके माहीम पश्चिम येथील नवसहयोग सोसायटीत घालवली होती. या इमारतीत आजही त्यांची आई निर्मला पाटेकर यांच्या नावे घर आहे. चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवून अंधेरीमध्ये स्वतःचा फ्लॅट घेतल्यानंतरही नाना या जुन्या परिसराला आणि तेथील शेजाऱ्यांना कधीच विसरले नाहीत.
“अंकुशमधील गाणं इथेच रेकॉर्ड झालं”
येथील रहिवाशांच्या मते, नाना अतिशय साधे, मनमिळाऊ आणि शिस्तप्रिय होते. जुने शेजारी चंद्रेश शाह आणि राजेंद्र पेधामकर यांनी आठवण सांगितली की, नानांनी कधीही सुपरस्टार असल्याचा गर्व बाळगला नाही. ते नेहमी सोसायटीत यायचे, लहान मुलांसोबत क्रिकेट खेळायचे आणि गणेशोत्सव व नवरात्रीसारखे सण आवर्जून सर्वांसोबत साजरे करायचे. अंकुश चित्रपटातील प्रसिद्ध इतनी शक्ती हमें देना दाता’या गाण्याचे रेकॉर्डिंग त्यांच्या याच घरात झाल्याचा दावाही शेजाऱ्यांनी केला.
मोलकरणीला आईसारखे वागवायचे
दुसऱ्या शेजारी विजयलक्ष्मी मेर यांनी सांगितले की, नाना गरबा उत्सवात सोसायटीच्या कामात मदत करायचे आणि माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून नाही, तर गुणांवरून ठरते असे मानायचे. त्यांचा साधेपणा फक्त शेजाऱ्यांपुरता मर्यादित नव्हता. त्यांच्याकडे तब्बल ३५ वर्षे काम करणाऱ्या मोलकरीण शालुबाई सासणे यांना नाना स्वतःच्या आईप्रमाणे वागवायचे, असे त्यांच्या मुलाने सांगितले. नाना अनेकदा परिसरातील लोकांसोबत जमिनीवर बसून गप्पा मारायचे.
काही वर्षांपूर्वी नाना पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसमध्ये राहायला गेले होते. मात्र, इतके मोठे अभिनेते असूनही आपले जुने दिवस न विसरणारा आणि सर्वांवर निखळ प्रेम करणारा एक साधा माणूस, अशीच त्यांची ओळख त्यांच्या जुन्या शेजाऱ्यांच्या मनात कायम राहील.