हा तो देश नाही, जिथे मी लहानाचा मोठा झालो..; नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर घणाघात

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना मुंबई विद्यापिठाच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रमाच्या एक दिवस आधी त्यांना न येण्यास सांगितलं गेलं. यामुळे नाराज झालेल्या नसीरुद्दीन यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

हा तो देश नाही, जिथे मी लहानाचा मोठा झालो..; नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर घणाघात
Narendra Modi and Naseeruddin Shah
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 9:53 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या मतांमुळे चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला असून त्यामध्ये त्यांनी थेट केंद्राच्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 75 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांनी या लेखाची सुरुवात मुंबई विद्यापिठाच्या ‘जश्न-ए-उर्दू’ या कार्यक्रमात आधी आमंत्रित करून नंतर न येण्यास सांगण्यापासून केली. या घटनेमुळे त्यांना फार वाईट वाटलं. परंतु नंतर त्यांनी असहिष्णुता आणि सत्तेचा दुरुपयोग यांसारखे मुद्दे उपस्थित करत परखडपणे म्हणाले की त्यांनी कधी स्वत:ला ‘विश्वगुरू’ म्हणणाऱ्यांचं कौतुक केलं नाही. ‘हा त्यांचा अहंकार आहे, ज्याबद्दल मला वाईट वाटतं’, असं नसीरुद्दीन यांनी लिहिलं.

मुंबई विद्यापिठाने जेव्हा त्यांना ‘जश्न-ए-उर्दू’ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं, तेव्हा त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रात हा लेख लिहिला. परंतु कार्यक्रमाच्या एक दिवस आधी त्यांना सांगितलं गेलं की ‘तुम्ही येण्याची गरज नाही.’ याच गोष्टीमुळे त्यांच्या मनात राग आणि दु:ख या भावना निर्माण झाल्या आहेत. कारण नसीरुद्दीन शाह या कार्यक्रमाची फार आतुरतेने प्रतीक्षा करत होते. तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते खूप उत्सुक होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधायला होते उत्सुक

‘जेव्हापासून मी अभिनेता बनण्याचं कठीण, रोमांचक पण अनेकदा समजण्यापलीकडे असलेलं काम सुरू केलं, तेव्हापासून मी त्या दिवसाचं स्वप्न पाहिलंय, जेव्हा मला ते पुरेसं समजेल आणि माझ्यापेक्षा लहान असलेल्यांसोबत शेअर करेन. अशा लोकांसोबत शेअर करेन ज्यांना माझ्यासारखंच मार्गदर्शनाची कमतरता आहे. गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी माझे बोधप्रद अनुभव विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत शेअर करतोय. स्वप्नांच्या दुनियेत राहणाऱ्या आणि नेहमीच शिकण्यास कचरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्लासमध्ये समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर माझ्या स्वभावातील आधीपासूनच कमी असलेला संयम आणखी कमी झाला आहे. या मार्गात मी बऱ्याच चुका केल्या आहेत, परंतु मी नि:संशयपणे म्हणू शकतो की मी कोणत्याही अभियन शिक्षकापेक्षा विद्यार्थ्यांसोबत काम करून जास्त शिकलोय’, असं त्यांनी लेखात लिहिलंय.

कारण न देता कार्यक्रमात येण्यापासून रोखलं

नसीरुद्दीन शाह पुढे लिहितात, ‘1 फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापिठाच्या उर्दू विभागाने आयोजित केलेल्या ‘जश्न-ए-उर्दू’ कार्यक्रमाची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो. परंतु शेवटच्या क्षणी मला त्यातून नकार देण्यात आला होता. विद्यापिठाने मला उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असं सांगितल्यानंतर (31 जानेवारीच्या रात्री आणि कोणतंही कारण न देता, माफी मागणं तर दूरच) अर्थातच मला ते अपमानास्पद वाटलं नाही. म्हणून त्यांनी प्रेक्षकांना हे सांगून थोडं आणखी मीठ चोळण्याचा प्रयत्न केला की मी त्या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला होता.’

या लेखात पुढे त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘होय, मी कधीच स्वत:ला विश्वगुरू म्हणवणाऱ्यांचं कौतुक केलं नाही. खरंतर मी त्यांच्या वागण्यावर टीका करतो. मला त्यांचा अहंकार त्रासदायक वाटतो आणि गेल्या 10 वर्षांत त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीने मी प्रभावित झालो नाही. मी अनेकदा सत्ताधारी सरकारच्या अनेक कृतींवर टीका केली आहे आणि पुढेही करत राहीन. आपल्या देशातील नागरी जाणीव आणि इतरांबद्दल विचारशीलतेचा अभाव यांबद्दल मी अनेकदा दु:ख व्यक्त केलं आहे. विद्यापिठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की शाह हे देशाविरोधात उघडपणे विधानं करतात. मी त्यांच्या या दाव्याला आव्हान देतो. त्यांनी एक असं विधान सादर करावं ज्यामध्ये मी या देशावर टीका केली असेन’, असं ते म्हणाले.

“हा तो देश नाही जिथे मी..”

या लेखात नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना त्रास देणाऱ्या अनेक मुद्द्यांची यादीच लिहिली आहे. विद्यार्थी कार्यकर्त्यांना खटल्याशिवाय दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं, गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्यांना जामीन मंजूर करणं, गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देणं, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बदल करणं आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारं राजकीय भाषण करणं.. यांसारख्या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. ‘अशी शत्रुत्वाची भावना किती काळ चालू राहू शकते? हा तो देश नाही जिथे मी वाढलो, ज्यावर मला प्रेम करायला शिकवलं गेलं’, असं परखड मत त्यांनी मांडलं आहे.

पद्मश्री आणि पद्म भूषण यांसारख्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित झालेल नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या लेखात पुढे इंग्रजी लेखक जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या पुस्तकाचाही उल्लेख केला आहे. ‘यामध्ये ‘थॉट पोलीस’चा उदय, पाळत ठेवणं आणि एका अशा संस्कृतीबद्दल बोललं गेलंय, जिथे मतभेदांना देशद्रोह मानलं जातं. जो एकेकाळी दोन मिनिटांचा द्वेष होता, तो आता 24 तासांच्या द्वेषात बदलला आहे. महान नेत्याची प्रशंसा न करण्याला देशद्रोह आणि तुम्हाला देशद्रोही जाहीर करण्याचा धोका वाढत चालला आहे’, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.