“हिंदू असो, मुस्लीम असो..”; पहलगाम हल्ल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रतिक्रिया चर्चेत

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि लज्जास्पद असल्याचं त्याने म्हटलंय. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन याठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता.

हिंदू असो, मुस्लीम असो..; पहलगाम हल्ल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रतिक्रिया चर्चेत
Nawazuddin Siddiqui on Pahalgam attack
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2025 | 9:00 AM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या घटनेवर नवाजुद्दीनने प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ल्याची ही घटना अत्यंत लज्जास्पद असून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल अशी मला खात्री असल्याचं त्याने म्हटलंय. “अर्थातच लोकांमध्ये खूप राग आणि दु:ख आहे. आपलं सरकार काम करतंय आणि ते नक्कीच दहशतवाद्यांना धडा शिकवतील. जे घडलं ते खूप वाईट होतं, खरंतर खूप लज्जास्पद आहे”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावर झालेल्या परिणामाबद्दल तो पुढे म्हणाला, “तिथल्या पर्यटनाला खूप मोठा फटका बसला आहे. पण त्याहीपेक्षा जास्त, काही गोष्टी मी स्वत: पाहिल्यानंतर असं निदर्शनास आलं की तिथले स्थानिक लोक खूप रागात आहेत. ते पर्यटकांना स्वत:च्या भावासारखी वागणूक देतात. ज्या पद्धतीने काश्मिरी लोक तुमचं स्वागत करतात, ते पैशांपेक्षाही मौल्यवान आहे. प्रत्येकाविषयी काश्मिरी लोकांच्या मनात जे प्रेम आहे, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. जेव्हा कधी लोक काश्मीरला भेट देऊन येतात, तेव्हा ते नेहमीच काश्मिरी लोकांचं कौतुक करतात. पण ही जी घटना घडली, त्याबद्दल त्यांच्या मनात खूप राग आहे. आपल्या जमिनीवर हे काय घडलं, असा राग त्यांच्या मनात आहे. ”

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात दिसून आलेल्या एकतेबद्दल नवाजुद्दीनने आपलं मत मांडलंय. अशा कठीण काळात सर्व धर्माचे लोक एकत्र येणं हा अभिमानाचा क्षण आहे, असं त्याने म्हटलंय. “या एका घटनेनं संपूर्ण देश एकवटला आहे. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. मग ते हिंदू असो, मुस्लीम असो, शीख असो, ख्रिश्चन असो.. सर्वजण असा दु:खद घटनेवेळी एकत्र येतात”, असं तो म्हणाला.

दरम्यान जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सोमवारी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अनेकदा भावूक झाले. यजमान राज्याचा मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री म्हणून पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली होती, मात्र यात कमी पडलो.. अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.