मी प्रेग्नंट आहे.., 67 वर्षीय नीना गुप्ता होणार आई? थेट म्हणाल्या “कोणाच्या बापाचं खात नाही”
Neena Gupta: नीना गुप्ता यांनी त्यांच्या वजनावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रोलर्सना सरळ सांगा की मी गरोदर आहे, असंच थेट त्यांनी त्यांच्या टीमला सांगून टाकलं.

Neena Gupta: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. वैयक्तिक आयुष्याबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपासून ते सोशल मीडियावरील ट्रोलिंगपर्यंत नीना गुप्ता कोणत्याही मुद्द्यावर आपलं मत मांडताना मागे हटत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी बॉडी शेमिंग आणि खासगी आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करणाऱ्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचं, याबद्दल सांगितलं. याचदरम्यान त्यांच्या ‘मी प्रेग्नंट आहे’ या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नीना गुप्ता यांनी सांगितलं की, एकदा साडी नेसताना त्यांनी कमरेजवळ कपडा व्यवस्थित केला नव्हता. त्यामुळे त्या भागात कपडा थोडा जास्त जमा झाल्यासारखा दिसत होता. यावरून काही लोकांनी त्यांच्या वजनावरून टिप्पणी करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्यांच्या वयाचा उल्लेख करत काहींनी त्या प्रेग्नंट आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला.
अशा प्रकारच्या कमेंट्स नीना यांनी मनावर घेतलं नाही. उलट त्यांनी त्यांच्या टीमला मजेशीर पद्धतीने सांगितलं की, कोणी विचारलं तर त्यांना सांगा, ‘हो, मी प्रेग्नंट आहे.’ त्यांच्या मते, शरीर किंवा वजनावर विनाकारण टिप्पणी करणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. अशा प्रसंगांना कधी कधी विनोदाने उत्तर देणं हा देखील एक मार्ग आहे.
लग्नाबाबत विचारणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर
केवळ बॉडी शेमिंगच नाही, तर लग्न आणि खासगी आयुष्याबाबत वारंवार प्रश्न विचारणाऱ्यांनाही नीना गुप्ता यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना त्या उलट विचारतात की, ‘तुम्हाला त्याच्याशी काय घेणं-देणं? मी तुमच्या बापाचं खात नाही. तुमची काय अडचण आहे?’ स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यासाठी इतरांच्या परवानगीची गरज नाही, असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.
नीना यांनी महिलांच्या कपड्यांवरून होणाऱ्या ट्रोलिंगवरही नाराजी व्यक्त केली आहे. महिलांनी काय घालावं, कसं दिसावं किंवा त्यांच्या शरीराचा आकार कसा असावा, याबाबत समाजाकडून अजूनही अपेक्षा लादल्या जात असल्याचं त्या म्हणतात. महिलांनी स्वतःच्या आवडीने कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, असं त्यांचं मत आहे.
नीना गुप्ता लवकरच ‘चुम्बक’ या कॉमेडी-ड्रामा वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सीरिजमध्ये शहरी भागातील पाच कुटुंबांच्या आयुष्याभोवती कथा फिरते. नीना यांच्यासोबत देवेन भोजानी, अर्जुन बिजलानी, हेली शाह, सुमीत व्यास, मानसी पारेख आणि सुमीत राघवन यांसारखे कलाकार आहेत.