Gargi Phule: निळू फुलेंच्या लेकीचा अभिनयाला रामराम! गार्गी आता करणार तरी काय?
अभिनेते निळू फुले यांची मुलगी गार्गीने मालिका विश्वाला रामराम ठोकला आहे. आता मालिका सोडल्यानंतर ती काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अभिनेते म्हणून निळू फुले ओळखले जायचे. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्या होत्या. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी गार्गी फुलेसुद्धा इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसत होती. वडिलांचा वारसा चालवणाऱ्या गार्गीने आता आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आहे. तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. इंडस्ट्रीसोडल्यावर गार्गी काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
गार्गीने नुकताच एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की मालिवाकाविश्वातून ती स्वेच्छा निवृत्ती घेत आहे. ‘मी गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे. माझे कुटुंब पुण्यात आहे. मी जवळपास गेल्या १० वर्षांपासून त्यांच्यांपासून लांब राहात आहे. खरं सांगू तर मालिकांचे शेड्युल हे फार विचित्र असते. पॅशन असेल तरच मराठी मालिकाविश्वामध्ये काम करावे. आरोग्य किंवा इतर गोष्टींचा विचार केला तर फार त्रास होतो. या शिवाय चॅनेलचे, निर्मात्यांचे जे प्रेशर असते ते वेगळे. या सगळ्यामुळे स्वत:साठी वेळच मिळत नाही. शिवाय तब्येतही बिघडते. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचं आहे. कितीही काम केलं तरी समाधान मिळत नाही’ असे गार्गी म्हणाली.
आता गार्गी काय करणार?
गार्गीने अभिनय क्षेत्राला जरी रामराम ठोकला असला तरी ती नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तिने ‘Solitude Holiday’ या नावाची ट्रॅव्हलिंग कंपनीचे अॅप सुरु केले आहे. या अॅपच्या माध्यमातून गार्गी फुले पर्यकटांना जगाची ओळख करून देणार आहे. हे अप सुरू करण्यामागचे उद्दिष्ट सांगताना त्या म्हणाल्या की, निळू फुले यांनाच फिरण्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची आवड होती. ते आपल्या लेकीला म्हणजेच गार्गीला घेऊन सर्वत्र भारतभर फिरायचे हीच आवड गार्गीला पण लागली. तिथूनच ही कल्पना त्यांना सुचली.
गार्गीने काम केलेल्या मालिकांविषयी
गार्गीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘तुला पाहाते रे’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘इंद्रायणी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
