
कायम स्टारकिड्ससोबत वावरणारा आणि आपल्या चित्रविचित्र स्वभावामुळे चर्चेत असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तब्बल 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलने ऑरीला समन्स बजावले आहेत. ऑरीला चौकशीसाठी आज (20 नोव्हेंबर 2025) अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेखला अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपीने कबुली दिली की तो देशात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्यांचं आयोजन करतो आणि त्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठाही करतो.
आरोपीने चौकशीदरम्यान विविध सेलिब्रिटींचीही नावं घेतली होती. नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दिकी, ऑरी उर्फ ओरहान, अब्बास मस्तान यांसारख्या इतर अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने देशात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्यांचं आयोजन केल्याचा दावा आरोपीने केला होता. इतकंच नव्हे तर त्याने स्वत:ला त्या पार्ट्यांमध्ये सामील होऊन त्या सेलिब्रिटींना आणि इतर लोकांना ड्रग्ज पुरवल्याचाही खुलासा त्याने केला होता. आता पोलीस या दाव्यांची पडताळणी करतेय आणि याच संदर्भात त्यांनी आता ऑरीला समन्स बजावले आहेत.
बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, निसा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी आता अंबानींच्याही विविध कार्यक्रमांमध्ये दिसतो. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे.
सलीम शेखने केलेल्या दाव्यानुसार ऑरी हा दाऊद इब्राहिमचा भाचा आलीशाह पारकरचा जवळचा मित्र आहे. ऑरी ड्रग्जचं सेवन करायचा तसंच ड्रग्ज पार्ट्यांमध्येही सहभागी व्हायचा, असा खुलासा सलीमने चौकशीत केलेला आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपी हे ट्रिमा, ज्यांगा, इंस्टाग्राम, फेसटाइम, सिग्नल अशा अॅप्लिकेशनचा वापर करत होते असाही खुलासा त्याने केला आहे. लवकरच अन्य सेलिब्रिटींनाही मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अभिनेत्री नोरा फतेहीने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तुमच्या माहितीकरता, मी पार्ट्यांना जात नाही. मी सतत काम करतेय. माझं काहीच खासगी आयुष्य नाही. मी अशा लोकांशी स्वत:ला कधीच जोडत नाही. जर मी सुट्टी घेतली तर माझ्या दुबईतल्या घरी जाते किंवा जवळच्या लोकांसोबत वेळ घालवते. माझं नाव हे आता सर्वांत सोपं टार्गेट बनलंय, असं मला वाटतंय. पण मी आता पुन्हा हे सर्व होऊ देणार नाही. लोकांनी मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, खोटं बोलले. परंतु ते माझं काहीच वाकडं करू शकले नाहीत. आता पुन्हा माझं नाव अशा चुकीच्या प्रकरणांमध्ये घेतलं, तर ते खूप महागात पडेल’, अशा शब्दांत तिने फटकारलं होतं.