फक्त लग्नात उपस्थित राहण्यासाठी ऑरीला मिळतात तब्बल इतके रुपये

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सचा मित्र ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी हा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कार्यक्रम कुठलाही असो त्यात सेलिब्रिटींसोबत विचित्र पोझमध्ये ऑरीचे विविध फोटो आवर्जून पहायला मिळतात. फक्त लग्नात उपस्थित राहण्यासाठीही त्याला पैसे मिळतात.

फक्त लग्नात उपस्थित राहण्यासाठी ऑरीला मिळतात तब्बल इतके रुपये
Orhan Awatramani
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2024 | 11:33 AM

मुंबई : 15 मार्च 2024 | ऑरी किंवा ओरहान अवत्रमणी हे नाव आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड झालंय. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, निसा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्येही दिसला. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. अनन्या पांडे, सारा अली खान, निसा देवगण, जान्हवी कपूर यांच्याशिवाय आता त्याचे फोटो चक्क आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानासोबतही व्हायरल झाले आहेत. जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये ऑरीने रिहानाचंही लक्ष वेधलं होतं. सेलिब्रिटींसोबत इतकी जवळीक असलेला हा ऑरी नेमका करतो तरी काय आणि त्याची कमाई कुठून होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द ऑरीनेच त्याच्या कमाईविषयी खुलासा केला आहे.

‘फोर्ब्स इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऑरीने सांगितलं की त्याला कार्यक्रमांमधून किती मानधन मिळतं. “सध्या तरी माझा उद्देश हाच आहे की आनंदाचा संदेश सर्वत्र पसरवावा. लोकांना ते आवडतं, त्यामुळे मलाही प्रेरणा मिळते. याच कारणामुळे मी विविध कार्यक्रमांना जाऊ शकतो. तिथे मी स्वत:ही आनंदी राहतो आणि इतरांनाही खुश करतो. विविध कार्यक्रमांना माझी उपस्थिती हाच सध्या माझ्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. मला लोक पाहुणे म्हणून नाही तर मित्र म्हणून लग्न समारंभाला बोलावतात. त्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी ते मला आनंदाने 15 ते 30 लाख रुपये देतात. मी त्याठिकाणी उपस्थित राहणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आणि आनंदाचं असतं.”

ऑरी हा अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’मध्ये तो एका दिवसासाठी गेला होता. त्यावेळी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऑरीने सांगितलं होतं की त्याच्याकडे 9 लाख 80 हजारांचं घड्याळ आणि दीड लाखांचे शूज आहेत. बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिड्ससोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडलाय.