‘हाऊस अरेस्ट’ शोमुळे मोठा वाद, चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांची मागणी काय?

उल्लू या ओटीटी अॅपवर सध्या 'हाऊस अरेस्ट' नावाचा शो चालू आहे. या शोचा पहिलावहिला एपिसोड प्रदर्शित होताच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या शोमधील काही दृश्य पाहून यात अश्लिलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप झालाय.

हाऊस अरेस्ट शोमुळे मोठा वाद, चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांची मागणी काय?
rupali chakankar and chitra wagh and house arrest and ullu app
| Updated on: May 02, 2025 | 8:42 PM

House Arrest Ullu OTT Show : उल्लू या ओटीटी अॅपवर सध्या ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो चालू आहे. या शोचा पहिलावहिला एपिसोड प्रदर्शित होताच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या शोमधील काही दृश्य पाहून यात अश्लिलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप झालाय. विशेष म्हणजे हा शो होस्ट करणाऱ्या एजाज खानवरही टीकेची झोड उठतेय. दरम्यान, आता हा एपिसोड उल्लू अॅपवरून हटवण्यात आला आहे. यावरच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाऊस अरेस्टसारख्या इतर शोवर कारवाई करण्यात येईल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

श्लील धिंगाणा खपवून घेणार नाही

हाऊस अरेस्टसारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेला खतपाणी देतात. त्यामुळेच या शो सारखे इतर शो आणि ऍप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील धिंगाणा खपवून घेणार नाही आणि त्याविरोधात मी कायम आवाज उठविणार, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील तर…

महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. हे केवळ एका शोपुरतं मर्यादित न राहता, ‘हाऊस अरेस्ट’सारखे इतर अश्लील आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील, तर त्यांच्यावरही तात्काळ बंदी घालणं आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

कठोर कायदेशीर कारवाई केली जावी

पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. “मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की, उल्लू अ‍ॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. अशा अ‍ॅप्सना परवाने देणाऱ्या यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित केली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलंय. तसेच महाराष्ट्रात महिला-मुलींचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य महिला आयोगाची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीदेखील हाऊस अरेस्ट या शोवर प्रतिक्रिया दिली आहे. उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हाउस अरेस्ट या शोमध्ये होस्ट एजाज खान हा सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारतो आहे. तसेच आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत. महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून, त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

हाऊस अरेस्ट शोमध्ये नेमकं काय घडलं?

उल्लू या अॅपवर हाऊस अरेस्ट हा शो दाखवण्यात आला. या शोचे होस्टिग एजाज खान याने केले आहे. या शोमध्ये काही महिला तसेच पुरूष स्पर्धक दाखवण्यात आले आहेत. या शोमध्ये महिला स्पर्धक त्यांच्या अंगावरील कपडे काढताना दाखवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एजाज खान हे कपडे उतरवण्यास महिलांना प्रोत्साहित करत असल्याचे दिसतेय. सोबतच महिला आणि पुरुष स्पर्धक यांना एकत्र करून अश्लिल अंगविक्षेप या शोमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यामुळेच या शोवर तसेच आयोजकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.