‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्याला अटक; अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रोहित चंडेल याला पोलिसांनी अटक केली असून पॉक्सो अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अटकेनंतर त्याला पॉक्सोअंतर्गत न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

‘पंड्या स्टोर’ आणि ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेला 29 वर्षीय टीव्ही अभिनेता रोहित चंडेल याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रोहितवर एका 16 वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याचा, तिचा छळ केल्याचा आणि तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत पॉक्सो कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या रोहित स्टार प्लसच्या ‘सैराब’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पंत नगर पोलिसांनी शुक्रवारी रोहितला दहिसर इथून अटक केली. अटकेनंतर त्याला पॉक्सोअंतर्गत न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहितविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला रोहित स्वत:च्या फोन नंबरवरून तसंच इतर अनेक फोन नंबरवरून वारंवार फोन करत होता, ज्यामुळे तिला तीव्र मानसिक त्रास झाला, असं तक्रारीत म्हटलंय. रोहित आणि पीडित मुलगी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे प्रकरण फक्त सतत कॉल करून त्रास देण्यापर्यंतच मर्यादित नव्हतं. तर 5 जुलै रोजी रोहित चंडेलने त्या मुलीला तिच्याच निवासी इमारतीजवळ थांबवलं होतं. जेव्हा तिने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहितने तिचा पाठलाग केला, तिच्याशी वाद घातला आणि तिला शिवीगाळ केली. रोहितने यावेळी तिच्यावर हातसुद्धा उचलला होता, असं तक्रारीत म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात पंत नगर पोलिसांनी रोहितविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत तसं भारतीय दंड संहितेच्या कलम 78 (पाठलाग करणे) आणि 115 (2) (जाणूनबुजून दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रोहित स्टार प्लस वाहिनीवरील ‘सैराब’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा कलाकार असल्याने वाहिनीच्या प्रतिष्ठेसाठी आणि मालिकेच्या लोकप्रियतेसाठी ही घटना अडचणीची ठरू शकते. याचाच विचार करत निर्माते वारंवार बैठका घेत असून हे प्रकरण आणखी चिघळल्यास काय करायचं, याचा विचार गांभीर्याने करत आहेत. पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये जामीन मिळणं अनेकदा कठीण असतं, त्यामुळे मालिकेच्या प्रसारणासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.