
अभिनेते पंकज धीर यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. सर्वांनाच त्यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. आज, 15 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यामध्ये अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसह अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
पंकज धीर यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले
पंकज धीर यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. जिथे दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील मान्यवर जमले होते. धीर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सलमान खान त्यांच्यासोबतच होता.
पंकज यांच्या अंत्यसंस्कारावेळी सलमान खान भावूक
पंकज आणि त्यांचा मुलगा निकितिन धीर यांच्याशी सलमानचे फार जवळचे नाते आहे. तो निकितिनला मिठी मारत त्याला धीर देतानाही दिसला. या कठीण काळात सलमान त्याला आधार देत असल्याचे दिसून आले. पण यावेळी सलमानही फार उदास झाला होता. पंकज यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी सलमान भावूक झाल्याचेही दिसून आले. एवढंच नाही तर सर्व विधी होईपर्यंत सलमान खान स्मशानभूमीतच उपस्थित होता. पंकज यांच्या कुटुंबाला आधार देताना दिसत होता.
सलमानने पंकज यांच्यासोबत “तुमको ना भूल पायेंगे” मध्ये काम केले आहे. तसेच निकितिनसोबत “रेडी”, “दबंग 2” आणि “अंतिम: द फाइनल ट्रुथ” यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सलमान खानसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
सलमान खानसोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अरबाज खान, मिका सिंग आणि मुकेश ऋषी हे देखील चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारही स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
पंकज धीर यांच्या पश्चात त्यांची पत्नी अनिता, मुलगा अभिनेता निकितिन धीर आणि सून कृतिका सेंगर, जी एक अभिनेत्री आहे, असा परिवार आहे. त्यांना 3 वर्षांची नात देविका देखील आहे. अभिनेता अमित बहल यांनी त्यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली.
अमित म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी ते आजारी होते, पण आता ते बरे झाले होते असंच मला समजलं होतं. ते पुन्हा कामावर आले होते. मी त्यांच्याशी सुमारे चार महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि ते बरा दिसतही होते. पण त्यांचे वजन फार कमी झाले होते आणि ते एका मालिकेत काम करत होते. मी त्यांच्याशी सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि अचानक त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. हे खरोखर दुःखद आहे.”