
प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या घरात एक दु:खद घटना घडली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन झाले आहे. पंकज यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे ही बातमी सर्वांना दिली. अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की श्री पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचे शुक्रवारी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी निधन झालं आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या आणि काही काळापासून आजारी होत्या. त्यांनी त्यांच्या घरीच पलंगावर शांततेत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्या आईसोबत उपस्थित होते.”
पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन
शनिवारी बेलसंड येथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्रिपाठी कुटुंब यामुळे खूप दुःखी आहे आणि सर्वांना श्रीमती हेमवंती देवी यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्याची नम्र विनंती केली आहे. कुटुंबाने माध्यमांना आणि हितचिंतकांना या दुःखाच्या काळात त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची आणि त्यांना शांततेत शोक करण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली आहे.
पंकज यांचे आई आणि वडील गावातच राहायचे
अभिनेते पंकज त्रिपाठी हे बिहारमधील गोपाळगंज येथील आहेत. ते त्यांच्या कारकिर्दीसाठी मुंबईत राहतात, तर त्यांचे वडील आणि आई गावातच राहायचे. एका खाजगी माध्यमाशी बोलताना त्रिपाठी यांनी एकदा खुलासा केला होता की त्यांच्या वडिलांना त्यांच्या कामात रस नाही. त्यांनी असेही म्हटले होते की त्यांना हे देखील माहित नाही की ते चित्रपटांमध्ये काम करतात.पंकज त्रिपाठी यांचे वडील शेतकरी होते आणि ते गावात राहून उपजीविकेसाठी राहत होते. त्यांचेही दोन वर्षांपूर्वी वयाच्या 98 व्या वर्षी वडिलोपार्जित गावातच निधन झालं होतं.
पंकज त्रिपाठी बॉलिवूडमधील अशा निवडक अभिनेत्यांपैकी एक
पंकज त्रिपाठी यांचे बालपण देखील त्याच गावात गेले. नंतर ते शिक्षणासाठी पाटणा येथे गेले. तिथे त्यांना नाट्यसृष्टीत रस निर्माण झाला आणि त्यांनी छंद म्हणून अभिनय करायला सुरुवात केली. यामुळे अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी या ध्येयासाठी अथक परिश्रम करण्यास सुरुवात केली. पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील अशा निवडक अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे नाव कमावले आणि श्रीमंतीकडे वाटचाल केली.आज बॉलिवूडमध्ये पंकज यांनी एक वेगळं स्थान आणि ओळख निर्माण केली आहे.