
महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा शिकून घ्या, असा आग्रह काही राजकारण्यांकडून केला जात आहे. इतकंच नव्हे तर मराठी बोलता येत नसल्याने मारहाणीच्याही घटना घडल्या आहेत. मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावरून बऱ्याच सेलिब्रिटींनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल मराठीत बोलताना दिसतेय. जेव्हा तिला पत्रकार हिंदीत बोलायला सांगतात, तेव्हा ते स्पष्ट नकार देते. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
काजोलने नुकत्याच एका पुरस्कार समारंभात हजेरी लावली होती. त्यानंतर तिने पत्रकारांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी ती मराठीत बोलत होती. त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी तिला हिंदीत प्रतिक्रिया द्यायला सांगितली, तेव्हा ती चिडली आणि म्हणाली, “आता मी हिंदी बोलायचं का? ज्यांना समजायचं असेल ते समजून घेतील.” या व्हिडीओवरून काजोलला काही नेटकरी ट्रोल करत आहेत.
‘मग बॉलिवूडसुद्धा हिंदीत का आहे? फक्त मराठीत करा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘चित्रपट हिंदीत करणार आणि बोलणार मराठीत. सर्व हिंदी भाषिकांनी यांचे चित्रपट बघणं बंद करा’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘तुला हिंदी बोलणाऱ्यांनीच स्टार बनवलंय’ अशाही शब्दांत काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. काहींनी काजोलला मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा सल्ला दिला आहे.
काजोल तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची ही स्पष्ट प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांना अजिबात आवडली आहे. त्यातच राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना तिने ही प्रतिक्रिया दिल्याने हिंदी भाषिक चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.
काजोलच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तिचा ‘सरजमीन’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिने दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याच्यासोबत काम केलंय. त्याआधी तिचा हॉरर-थ्रिलर ‘माँ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.