अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब..; 25 कोटींच्या नोटिशीवर परेश रावल यांनी सोडलं मौन

'हेरा फेरी 3' या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना थेट 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. यावर आता परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब..; 25 कोटींच्या नोटिशीवर परेश रावल यांनी सोडलं मौन
Paresh Rawal and Akshay Kumar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2026 | 9:00 AM

‘हेरा फेरी’ या फ्रँचाइजीमधील तिसऱ्या भागावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. ‘हेरा फेरी 3’च्या मालकीवरून सुरू झालेला वाद आता टोकावर पोहोचला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि चित्रपटसुद्धा पुढे ढकलण्यात आलं आहे. यादरम्यान आता दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारकडून मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षीच ‘हेरा फेरी 3’ची शूटिंग सुरू होणार होती, मात्र त्याआधीच परेश रावल यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि चित्रपटाचं होणारं नुकसान पाहता अक्षय कुमारने थेट त्यांना 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. यानंतर काही दिवसांनंतर हे प्रकरण थंडावलं आणि परेश रावल यांनी चित्रपटात परतण्याची घोषणा केली. आता पुन्हा एकदा त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘हेरा फेरी 3’मधून का बाहेर पडले?

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, “मी अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी कम्फर्टेबल नाही. ही एका कराराशी संबंधित गोष्ट होती. जर मला चित्रपट करायचा होता, तर मला निर्माते फिरोज यांच्या मंजुरीची गरज होती, कारण ‘हेरा फेरी’ या फ्रँचाइजीचे ते एकमेव मालक आहेत. ‘आवारा पागल दिवाना’, ‘वेलकम’ यांसारख्या इतर चित्रपटांचेही तेच मालक आहेत. जोपर्यंत मला त्यांची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत मी काहीच वचन देऊ शकत नव्हतो.”

अक्षय कुमारला टोमणा

जेव्हा परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून माघार घेतली, तेव्हा निर्माता आणि अभिनेता अक्षय कुमारने त्यांच्यावर कराराचा भंग केल्याचा आणि प्रकल्पाचं नुकसान केल्याचा आरोप करत 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवली. ही नोटीस पाहून परेश रावल यांना धक्काच बसला. ते म्हणाले, “जेव्हा मला कायदेशीर नोटीस आली, तेव्हा मला असं वाटलं की, मला या कायदेशीर बाबींमध्ये का ओढलं जात आहे? मी इथे चित्रपट बनवण्याचा आनंद घेण्यासाठी आहे की यात अडकण्यासाठी? तेव्हा मी स्वत:ला सांगितलं की मला आता याचा भाग व्हायचंच नाहीये. मी त्याला नाही कसा म्हणू शकतो, या विचाराने अक्षय कुमार कदाचित भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झाला असावा.”

‘हेरा फेरी 3’च्या या संपूर्ण वादावर अद्याप अक्षय कुमारने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल या तिघांच्या मुख्य भूमिका आहेत. याचे पहिले दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागातही तेच तीन कलाकार पुन्हा एकत्र दिसावेत, अशी अनेकांची इच्छा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us