
Robo Shankar: चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता रोबो शंकरच निधन झालं आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्याचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाल्यानंतर रोबो शंकरला चेन्नईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला किडणीचा त्रास जाणवत होता. बुधवारी त्याची प्रकृती आणखी खालावल्यानंतर त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. अखेर गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास त्याने या जगाचा निरोप घेतला. 17 सप्टेंबर रोजी रोबो शंकर चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आपल्या सिग्नेचर ‘रोबोट स्टाइल’ डान्समुळे त्याने वेगळी ओळख निर्माण केली होती. म्हणूनच त्याला ‘रोबो शंकर’ असं नाव देण्यात आलं. 2000 च्या दशकात त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली होती. ‘कलक्का पोवथु यारु’ या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘इधारकुथाने आसाइपट्टाई बालकुमारा’ आणि ‘वायाई मूडी पेसावुम’ यांसारख्या चित्रपटांमधून शंकरला यश मिळालं. तमिळ चित्रपटसृष्टीतील तो लोकप्रिय अभिनेता होता. ‘वेलैनु वंधुट्टा वेल्लैकारन’, ‘कदवुल इरुकान कुमारु’, ‘सिंगम 3’, ‘विस्वासम’ आणि ‘कोबरा’सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. धनुषच्या ‘मारी’ या चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती.
ரோபோ சங்கர்
ரோபோ புனைப்பெயர் தான்
என் அகராதியில் நீ மனிதன்
ஆதலால் என் தம்பி
போதலால் மட்டும் எனை விட்டு
நீங்கி விடுவாயா நீ?
உன் வேலை நீ போனாய்
என் வேலை தங்கிவிட்டேன்.
நாளையை எமக்கென நீ விட்டுச்
சென்றதால்
நாளை நமதே.— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 18, 2025
काविळमुळे शंकरच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला होता. आजारपणामुळे त्याचं बरंच वजन कमी झालं होतं. रोबो शंकरच्या पश्चात पत्नी प्रियंका शंकर आणि मुलगी इंद्रजा शंकर असा परिवार आहे. अभिनेते कमल हासन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रोबो शंकरला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘रोबो हे फक्त एक टोपणनाव आहे. माझ्या डिक्शनरीमध्ये तू एक संपूर्ण व्यक्ती आहेस. तू माझा छोटा भाऊ आहेस. मला असं सोडून जाशील का तू? तुझं काम संपलं आणि तू निघून गेलास. माझं काम अपूर्णच आहे’, अशा शब्दांत कमल हासन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. रोबो शंकरचं पार्थिव चेन्नईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज (शुक्रवार) त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.