“याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे..”; उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित सिनेमाचा जबरदस्त टीझर

जेव्हा न्यायाला एका आवाजाची गरज होती, तेव्हा एक माणूस त्याचा प्रहार बनला, असं कॅप्शन देत या अभिनेत्याने 'प्रहार' या चित्रपटाचा दमदार टीझर पोस्ट केला आहे. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे..; उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित सिनेमाचा जबरदस्त टीझर
उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2026 | 2:46 PM

अभिनेता राजकुमार राव चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राजकुमारच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताचे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात राजकुमारने त्यांची भूमिका साकारली आहे. उज्जव निकम यांनीच दहशवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळवून दिली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील राजकुमारचा लूक समोर आला होता. उज्ज्वल निकम यांनी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रदीर्घ लढा दिला होता. हीच कथा आता मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार आहे. हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या टीझरमध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित मुद्द्यांवर एक चर्चा दाखवण्यात आली आहे. या टीझरमधील राजकुमारच्या लूक आणि देहबोलीवरून स्पष्ट दिसून येत आहे की त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. कोर्टरुममधील राजकुमारच्या दमदार अभिनयाचं नेटकरी कौतुक करत आहेत. या टीझरमधून जास्त काही उघड होत नसलं तरी त्याचं पार्श्वसंगीत आणि दृश्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी आहेत.

पहा टीझर-

उज्ज्वल निकम हे देशातील सर्वांत प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक मोठ्या आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारचं प्रतिनिधित्व केलं आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. ते त्याच्या कायदेविषयक ज्ञानासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. उज्ज्वल निकम यांनी 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मधील मुंबई हल्ला, 2013 मधील मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2026 च्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातही ते विशेष सरकारी वकील होते. निकम यांना भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.

कायद्याच्या क्षेत्रातील या उल्लेखनीय योगदानाबद्दल, विशेषत: अनेक हाय प्रोफाइल गुन्हेगारी आणि दहशतवाद प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून बजावलेल्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 मध्ये त्यांना राज्यसभेवर नियुक्त केलं.

Follow Us