प्राजक्ता सेटवर उशीरा आली, प्रसाद खांडेकरने असं काही सुनावलं की प्राजक्ताला रडू कोसळलं

'चिकी चिकी बुबूम बूम' चित्रपटातून प्राजक्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ते ही एका वेगळ्या ढंगात. दरम्यान चित्रपटाच्या शुटींगवेळी सेटवर प्राजक्ताला उशीर झाल्याने प्रसाद खांडेकर असं काही बोलला की प्राजक्ताला तिथेच रडू कोसळलं. हा किस्सा प्रसाद खांडेकरने स्वत:चं सांगितला आहे. असं काय बोलला होता प्रसाद खांडेकर?

प्राजक्ता सेटवर उशीरा आली, प्रसाद खांडेकरने असं काही सुनावलं की प्राजक्ताला रडू कोसळलं
| Updated on: Mar 01, 2025 | 9:45 AM

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी काहीना काही कारणांमुळे चर्चेत आहे. महाशिवरात्रीला तिच्या कार्यक्रमास विरोध झाल्यानं बऱ्याच चर्चा रंगल्या अखेर प्राजक्ताने स्वत:हूनच या कार्यक्रमाला उपस्थित राहणं रद्द केलं. प्राजक्ता आता एका चित्रपटामुळेही तेवढीच चर्चेत आहे. प्राजक्ता ‘फुलवंती’नंतर अजून एका मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘चिकी चिकी बुबूम बूम’.

शूटिंगच्या सेटवर प्राजक्ता माळीसोबत घडलेला किस्सा

या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी काही मित्र एकत्र जमतात आणि नंतर काही विचित्र घटनांमुळे त्यांच्यावर बरीच संकट येतात. अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीत प्रसाद खांडेकरने शूटिंगच्या सेटवर प्राजक्ता माळीसोबतचा एक किस्सा सांगितला.

प्रसाद खांडेकरनं प्राजक्ताला सुनावलं

सेटवर प्राजक्ता माळीला प्रसाद खांडेकर असं काही बोलला की प्राजक्ता थेट रडायलाच लागली. ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनं केलं आहे. एका मुलाखतीत प्रसाद खांडेकरनं शूटिंग सेटवरील हा किस्सा सांगितला आहे. प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्राचे आणि सिनेमाचं शूटिंग असं दोन्ही शेड्युल सांभाळून काम करत होती. त्यासाठी तिला वेळेचे नियोजन करावे लागत होतं. एकेदिवशी ती सिनेमाच्या सेटवर 2 वाजता ऐवजी 4 वाजता पोहचली. हास्यजत्रेच्या शूटमुळे ती वेळेवर पोहचू शकली नाही. पण सेटवर पोहचल्यावर ती लगेच म्हणाली की, “मी तयार आहे फक्त हेअर आणि कॉश्च्युम सेट करायचा आहे. 10 मिनिटांत पूर्ण तयार होईन.”

प्राजक्ता भावूक झाली अन्…

त्या दिवशी सेटवर सीनची तयारी आधीच सुरू होती आणि संपूर्ण टीम प्राजक्ताचीच वाट पाहत होती. त्यामुळे प्रसाद खांडेकरने तिला मस्करीत म्हटलं की, “वाह! खूप दमल्याचा अभिनय करतेस.” हे ऐकल्यावर प्राजक्ता भावुक झाली आणि तिला रडू कोसळलं. त्यानंतर ती म्हणाली की, “दादा मी इतक्या धावपळीने वेळेवर पोहचण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही असं म्हणताय? प्राजक्ताचे हे बोलणं ऐकल्यावर प्रसाद खांडेकरला समजलं की आपल्या बोलण्यामुळे तिला वाईट वाटलंय. त्याने लगेच तिची माफी मागितली आणि स्पष्ट केलं की, त्याने हे गंमतीत म्हटलं होतं. तिला दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता.

हास्यजत्रेची टीम पुन्हा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीने रावी या तरुणीची भूमिका साकारली आहे. रावी अतिशय चुलबुली आणि उत्साही मुलगी आहे पण ती गोंधळलेली सुद्धा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दरम्यान या सिनेमात प्राजक्ता माळीसोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद खांडेकर,रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा 28 फेब्रुवारी रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हास्य जत्रेची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या ढंगात पाहायला मिळणार आहे.