टॉपचे स्टार्स चूप का? जे शांत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही; प्रकाश राज यांनी टोचले कान
NEET पेपर लीक प्रकरणी सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवरील CJP चे आंदोलनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच प्रकाश राज यांनी बॉलिवूडच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सोमवारी अधिक आक्रमक स्वरूप धारण केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच CJP ने ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केली. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.
रविवारी अभिनेते प्रकाश राज यांनी जंतर-मंतर येथे आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना खुलेपणाने समर्थन दिले. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. तसेच या संवेदनशील मुद्द्यावर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी मौन बाळगल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रकाश राज काय म्हणाले?
एका मुलाखतीत बोलताना प्रकाश राज म्हणाले की, ‘जे लोक या विषयावर बोलत आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण जग पाहत आहे. कोण जनतेसाठी उभा राहतो आणि कोण गप्प बसतो, हे सर्वांना दिसत आहे.’ आपल्या चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘मला कोणावर टीका करायची नाही. मी फक्त माझ्या भूमिकेबद्दल बोलू शकतो. अशा आंदोलनांमधून कोणामध्ये सत्यासाठी उभे राहण्याची हिंमत आहे, हे स्पष्ट होते.’
पुढे ते म्हणाले, ‘ज्यांचा समाजात मोठा प्रभाव आहे, ज्यांचा आवाज लोक ऐकतात अशा मोठ्या कलाकारांनी या विषयावर भूमिका घेतली असती तर मला आनंद झाला असता. मात्र त्यांनी मौन बाळगले. आता जनताच त्यांचे मूल्यांकन करेल. भविष्यात त्यांना लोकांसमोर उत्तर द्यावे लागेल. इतिहासात चुकी करणाऱ्यांना कदाचित लोक विसरतील पण अन्यायाच्या वेळी गप्प राहिलेल्यांना लोक कधीच माफ करणार नाहीत.
CJP च्या आंदोलनाला मोठा पाठिंबा
दरम्यान, CJP च्या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला समर्थन देत उपोषण केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दर्शवित उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.
या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, गायक-संगीतकार विशाल ददलानी, अभिनेत्री दिया मिर्झा आणि अभिनेत्री कविता कौशिक यांसारख्या कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र बॉलिवूडमधील अनेक आघाडीचे कलाकार या वादग्रस्त विषयावर अद्यापही मौन बाळगत असल्याची चर्चा सुरू आहे.