‘बिग बॉस 19’ ग्रँड फिनालेमधील त्या कृत्यामुळे प्रणित मोरेवर भडकले युजर्स; म्हणाले ‘जराही पश्चात्ताप नाही..’

'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेच्या फक्त चार आठवड्यांआधी प्रणित मोरेनं मित्र अभिषेक बजाजची फसवणूक केली होती. नॉमिनेशनदरम्यान त्याने अशनूर कौरला वाचवून अभिषेकला घराबाहेर काढलं होतं. आता ग्रँड फिनालेमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा झाली.

बिग बॉस 19 ग्रँड फिनालेमधील त्या कृत्यामुळे प्रणित मोरेवर भडकले युजर्स; म्हणाले जराही पश्चात्ताप नाही..
प्रणित मोरे
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 09, 2025 | 3:55 PM

ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘बिग बॉस 19’ची सांगता रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी झाली. गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला. तर फरहाना भट्ट फर्स्ट रनरअप होती. त्यानंतर प्रणित मोरे तिसऱ्या स्थानी राहिला. एकीकडे प्रणितला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं, तर दुसरीकडे ग्रँड फिनालेमधील त्याच्या एका कृत्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले. फिनालेमध्ये प्रणितने अभिषेक बजाजला घराबाहेर काढण्यावरून त्याची खिल्ली उडवली. यावरून युजर्सने तीव्र नाराजी व्यक्त केली. बिग बॉसच्या घरात अभिषेक बजाज आणि प्रणित मोरे यांची चांगली मैत्री झाली होती. परंतु ऐनवेळी प्रणितने त्याला दगा दिला आणि नंतर फिनालेमध्ये त्याची खिल्ली उडवल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

अभिषेक बजाजचाही सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने अभिषेक बजाज आणि अशनूर कौर या दोघांपैकी एकाला निवडण्याची जबाबदारी प्रणित मोरेवर सोपवली होती. तेव्हा प्रणितने अशनूरला वाचवलं होतं. तेव्हासुद्धा प्रेक्षक प्रणितवर नाराज झाले होते. आता पुन्हा एकदा त्याच्यावर टीका होत आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेदरम्यान घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांशी बोलताना सूत्रसंचालक सलमान खान आठवण करून देतो की कशा पद्धतीने प्रणितने अभिषेकला निवडलं नव्हतं आणि त्याला घराबाहेर काढलं होतं. त्यावर अभिषेक म्हणतो, “तुम्ही त्याच्याबद्दल मला आधीच इशारा दिला होता, तेसुद्धा अनेकदा. परंतु आता आपण करू तरी काय शकतो?”

सलमान मस्करीत पुढे म्हणतो की, प्रणितने अभिषेकसोबत असं केलं, कारण अभिषेकने नगमा मिराजकरसोबत तेच केलं होतं. तेव्हा स्वत:ची बाजू मांडत अभिषेक सांगतो की, त्याने नगमाला वाचवण्यासाठी तसं केलं होतं. तेव्हा लगेच प्रणित हसत म्हणतो, “मलासुद्धा वाचवायचं होतं, परंतु अशनूरला. तू कडी लावली होती, मी ती उघडली.” आता प्रणितच्या याच मस्करीमुळे त्याच्यावर टीका होत आहे.

‘थोडीतरी सहानुभूती दाखव. पण अभिषेकच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा त्याला गर्व आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘अजूनही त्याला जराही पश्चात्ताप नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं. अभिषेक बजाज, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांना फिनालेच्या चार आठवड्यांआधी नॉमिनेट करण्यात आलं होतं. प्रणितकडे या तिघांपैकी एकाला वाचवण्याची संधी होती. तेव्हा त्याने अशनूरची निवड केली होती.