प्रिती झिंटाने कार अपघातात गमावलं पहिलं प्रेम; आजसुद्धा आठवणीत कोसळतं रडू

अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या पहिल्या प्रेमाची हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितली आहे. आजही त्याच्या आठवणीत रडू कोसळत असल्याचा खुलासा प्रितीने केला. सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना तिने याबद्दल सांगितलं आहे.

प्रिती झिंटाने कार अपघातात गमावलं पहिलं प्रेम; आजसुद्धा आठवणीत कोसळतं रडू
प्रिती झिंटा
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2025 | 1:07 PM

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी आयपीएल सामन्यांदरम्यान ती अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते. त्याचसोबत सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रीय असते. नुकताच तिने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील प्रश्नोत्तरांदरम्यान चाहत्यांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्याने तिला ‘कल हो ना हो’ या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना प्रितीने तिच्या खासगी आयुष्यातील एक हळवा प्रसंग सांगितला. प्रिती सहसा तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु यावेळी तिने तिच्या मनाच्या कोपऱ्यातील एक दु:खद आठवण चाहत्यांना सांगितली आहे.

एक्स अकाऊंटवर एका युजरने प्रितीला विचारलं, ‘मी जेव्हा जेव्हा तुझा कल हो ना हो हा चित्रपट पाहतो, तेव्हा लहान मुलासारखं रडतो. नैना कॅथरिन कपूर या भूमिकेत तू अप्रतिम काम केलंस. यातून हेसुद्धा शिकायला मिळालं की कधी कधी प्रेमाचा खरा अर्थ हा त्याग असतो. जेव्हा तू वीसएक वर्षांनंतर हा चित्रपट पाहते, तेव्हा तू सुद्धा आमच्यासारखी रडतेस का?’

चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना प्रितीने लिहिलं, ‘होय, मी जेव्हा कधी हा चित्रपट पाहते, तेव्हा मला रडू येतं. जेव्हा आम्ही त्याचं शूटिंग करत होतो, तेव्हासुद्धा मी खूप रडले होते. एका कार अपघातात मी माझ्या पहिल्या प्रेमाला गमावलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचा माझ्यावर एक वेगळाच परिणाम होतो. विशेष म्हणजे, या चित्रपटातील बहुतांशी सीनदरम्यान कलाकार खरंच रडले होते. अमनच्या निधनाच्या सीनचं शूटिंग करताना सर्वजण कॅमेरासमोर तर रडलेच, परंतु कॅमेरामागेही असलेल्यांनाही अश्रू अनावर झालं होतं.’

निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कल हो ना हो’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली होती. यामध्ये प्रिती झिंटासोबत शाहरुख खान आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामध्ये अमनची भूमिका शाहरुखने साकारली होती. चित्रपटात आजारपणामुळे त्याने आपले प्राण गमावल्याचं दाखवलं गेलंय. गेल्या वर्षी हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हासुद्धा प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ‘कल हो ना हो’च्या सीक्वेलचीही जोरदार चर्चा होती. परंतु कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाशी बोलताना दिग्दर्शक निखिल यांनी स्पष्ट केलं की या चित्रपटाचा सीक्वेल बनणार नाही. ‘कल हो ना हो 2’ कधीच बनवला नाही पाहिजे, असंही स्पष्ट मत त्यांनी मांडलं होतं.