
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांना खूप मागणी असते. बाप्पाला आणायचं असेल किंवा त्याच्या विसर्जनाची वेळ आली असेल त्यासाठी वाजत-गाजत तयारी करावी अशी प्रत्येकाच इच्छा असते. आणि मग त्यासाठी अनेक ढोल-ताशा पथकांना निमंत्रण दिलं जातात. त्यासाठी हे वादक खूप महिने आधीपासूनच तयारी करत असतात. प्रत्येक शहरातील नेक पथक लोकप्रिय असतात. पुण्यातही अनेक ढोल-ताशा वादक पथक आहेत. पण त्यातील एक लोकप्रिय पथक म्हणजे कलावंत ढोलताशा पथक. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार या पथकाचे सदस्य असून ते वादन करताना दिसतात.
कलावंत ढोल ताशा पथकाकडून कलाकार राबवणार पुण्यात विशेष मोहीम
मात्र नुकत्याच झालेल्याया गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत आलेल्या खेदजनक अनुभवानंतर आता कलावंत ढोल ताशा पथकाकडून पुण्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या विरोधात कलावंत ढोल ताशा पथकातील कलाकारांकडून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. उत्सव मिरवणुकांमध्ये DJ ला बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आता मराठी कलाकारांकडून पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. येत्या रविवारी पुण्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेमध्ये अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत.डॉल्बी आणि साऊंड वापरावर प्रशासनाने बंदी आणावी यासाठी, या मोहिमेतील संकलित स्वाक्षऱ्या आणि निवेदन हे लवकरच माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती कलाकार सौरभ गोखले याच्याकडून देण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या काय ?
धार्मिक, सांस्कृतिक उत्सवांच्या मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी निमित्त निघणाऱ्या मिरवणुका, शोभायात्रांमध्ये डीजे /डॉल्बी आणि तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करणे, जेणेकरून स्थानिक रहिवाश्यांना त्या आवाजाचा त्रास आणि त्यामुळे होणारी शारीरिक हानी (बहिरेपणा इत्यादी) होणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी ला आळा घालता येईल आणि इतर अनुचित प्रकार घडणे टाळता येईल. अशा मागण्या यात करण्यात आल्या आहेत.
तसेच मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आणि कलाप्रकारांना प्रोत्साहन देणे. ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी नियम सूची तयार करणे अशाही काही या ढोलपथकाच्या सदस्यांच्या मागण्या आहेत.
या मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन कलावंत ट्रस्ट तर्फे केले जात आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी Digital Petition साइन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या Petition ची लिंक त्याच दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
गणपती मिरवणुकीत आला खेदजनक अनुभव
कलावंत ढोल -ताशा पथकाला गणेश विसर्जनादरम्यान एक खेदजनक अनुभव आला होता. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवरून एक पोस्ट करत नाराजीही दर्शवली होती. ‘ एक खेदजनक अनुभव! कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं… त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्यावेळी सायंकाळी 6 वाजता वादनासाठी तयार असून आणि मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करू नये टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री 9 वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला… आम्हाला उत्सुकतेने पहावयास आलेल्या चहा त्यांचा हिरमोड झाला त्याबद्दल क्षमस्व!! आता भेटूया पुढच्या उत्सवात!! गणपती बाप्पा मोरया!! कलावंत व्यवस्थापन.’ असे त्यामध्ये लिहीण्यात आले होते. श्रुती मराठेसह अनेक कलाकारांनी ही पोस्ट त्यांच्या अकाऊंटवरील स्टोरीवर शेअरही केली होती.
याच पार्श्वभूमीवर आता कलावंत पथकाकडून पुण्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.