‘पुरुषोत्तम करंडकाच्या निर्णयाचा निषेध’; विजू मानेंची रोखठोक पोस्ट

'पुरुषोत्तम करंडक दिला नाही, फक्त रोख पारिषोतिक'; यावर तुमचं काय मत?

'पुरुषोत्तम करंडकाच्या निर्णयाचा निषेध'; विजू मानेंची रोखठोक पोस्ट
विजू मानेंची रोखठोक पोस्ट
Image Credit source: Facebook
स्वाती वेमूल

|

Sep 19, 2022 | 3:27 PM

यंदाच्या पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) स्पर्धेचा ऐतिहासिक निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित या स्पर्धेचं यंदाचं 57वं वर्ष होतं. या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक दिला नाही. पी. आय. सी. टीच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेला फक्त रोख पारितोषिक दिलं गेलं, पुरुषोत्तम करंडक दिला नाही. सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांमध्येही पात्र कलाकार नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकंही कोणालाही जाहीर केली नाहीत. यावरून विविध मतमतांतरे व्यक्त होत आहेत. दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. फेसबुकवरील त्यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विजू माने यांची पोस्ट-

‘निषेध. मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतलं लॉजिक इथे का लावलं जात नाही? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवसरात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही,’ असं त्यांनी लिहिलं.

निर्णयाचा निषेध करत त्यांनी पुढे म्हटलं, ‘एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच ‘नाडण्याची करणी’ करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे, त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या. तुम्ही तरी तुमच्या शाळेत 100 पैकी 100 मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही ह्याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत.’

विजू मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘या अशा प्रकारामुळे ज्या मुलांनी एकांकिका सादर केल्या असतील त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं,’ असं एकाने लिहिलं. तर एकांकिका स्पर्धांचे नियम आता काळानुरूप बदलायला हवेतच, असं मत दुसऱ्या युजरने मांडलं. अभिनेता संतोष जुवेकरनेही विजू मानेंच्या या पोस्टवर सहमत असल्याची प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें