“बाबासाहेबांच्या पायांवर नाक घासा”… डॉ. बाबासाहेबांबद्दल वक्तव्य अन् राहुल सोलापूरकरांवर आंबेडकरी संघटना आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेते राहुल सोलापूरकरांवर महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला गेला. हा वाद शांत होत नाही तोच आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्यानं सोलापूरकर पुन्हा वादात भोवऱ्यात सापडलेत.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यावरून अख्खा महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला होता. सोलापूरकरांविरोधात आंदोलनही करण्यात आली होती. जेव्हा त्यांनी सर्वांची व्हिडीओद्वारे माफी मागितली तेव्हा हे प्रकरण थोडं शांत झालं.
मात्र तरीही त्यांच्याबद्दल राग हा व्यक्त केला जातच होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता राहुल सोलापुरकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य अन् सोलापूरकर पुन्हा वादात
राहुल सोलापूरकरांनी आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक वक्तव्य केलं ज्याबद्द पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आंबेडकरी संघटनांनी विरोध करत संताप व्यक्त केला आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट बघायला मिळाली होती.
अशातच राहुल सोलापूरकर यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे, जे सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
काय म्हणाले सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण आहेत, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच जितेंद्र आव्हाडांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा विरोध दर्शवत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी सोलापूरकर आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“अन्यथा तोंडाला काळे फासू….”
सचिन खरात यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,” मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.” असं म्हणत त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
तसेच राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांवर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांच्याकडून देण्यात आला आहे.