Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; 100 कोटींपासून फक्त इतकी पावलं दूर

Raja shivaji box office collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बजेटचा खर्च कमाईतून वसूल केला आहे. आता यापुढे होणारी कमाई हा चित्रपटाचा नफा असेल. गेल्या 14 दिवसांत या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले, ते जाणून घ्या..

Raja Shivaji : राजा शिवाजी चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; 100 कोटींपासून फक्त इतकी पावलं दूर
राजा शिवाजी
Image Credit source: Instagram
| Updated on: May 15, 2026 | 8:47 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. विशेषकरून महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तो बॉक्स ऑफिसवर हिट होईल अशी प्रचंड चर्चा होती आणि नेमकं तसंच घडलं. 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाने आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच तो कोट्यवधींची कमाई करत आहे. वीकेंडला कमाईत चढउतार झाला तरी हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आहे.

‘राजा शिवाजी’ने आपला संपूर्ण खर्च वसूल केला आहे. यापुढे चित्रपटाच्या कमाईतून केवळ नफा होणार आहे. रितेशच्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावले होते. आता प्रदर्शनाच्या चौदाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी, ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड डेटानुसार, ‘राजा शिवाजी’ने 1.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 24.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे रितेशच्या या चित्रपटाचा आतापर्यंतचा कमाईचा एकूण आकडा 76.95 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या 14 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी आणखी 23 कोटींची गरज आहे. या चित्रपटाची एकंदरीत कामगिरी पाहता तिसऱ्या वीकेंडमध्ये त्याच्या कमाईला गती मिळेल आणि तिसऱ्या आठवड्यातच हा टप्पा ओलांडला जाईल, अशी अपेक्षा आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. त्यानेच यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रितेशसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनिलिया डिसूझा, बोमन इराणी, भाग्यश्री, विद्या बालन, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांच्याही भूमिका आहेत.

बाळ शिवाजी ते राजा शिवाजीपर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आलं आहे.

Follow Us