मी 9 वर्षांचा असताना बाबा वारले, इंडस्ट्रीतून कोणीच मदत केली नाही; प्रसिद्ध अभिनेत्याकडून दु:ख व्यक्त

बॉलिवूड इंडस्ट्रीत घराणेशाहीमुळे स्टारकिड्सना लवकर संधी मिळते, असं म्हटलं जातं. इतरांसारखं त्यांना संघर्ष करावा लागत नाही, असं अनेकांचं मत असतं. परंतु प्रत्येक स्टारकिडला ही गोष्ट लागू होत नाही, हे अभिनेता रजत बेदीवरून समजतं.

मी 9 वर्षांचा असताना बाबा वारले, इंडस्ट्रीतून कोणीच मदत केली नाही; प्रसिद्ध अभिनेत्याकडून दु:ख व्यक्त
Rajat Bedi
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2025 | 11:45 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. परंतु घराणेशाहीचा फायदा सर्वच स्टारकिड्सना होतो असा नाही. स्टार किड्स असूनही काहींनी या इंडस्ट्रीत फार संघर्ष करावा लागतो. दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राजिंदर सिंग बेदी यांचा नातू असूनही अभिनेता रजत बेदीला असाच काहीचा अनुभव आला. रजतला बॉलिवूडमध्ये अपेक्षित असं यश मिळालं नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीने त्याची किंवा त्याच्या कुटुंबीयांची मदत केली नव्हती, असा खुलासा त्याने केला आहे.

“मी 9 वर्षांचा असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. मला स्पष्ट आठवतंय की दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि त्यांच्या कुटुंबीयांशिवाय इंडस्ट्रीतील कोणीही आमच्याकडे मागे वळून पाहिलं नाही. बाबांच्या निधनानंतर जवळपास सहा महिने ते एक वर्षापर्यंत प्रकाशजी आमच्या घरी पैसे पाठवत होते. वहिनी, काही काळजी करू नका.. असं त्यांनी माझ्या आईला म्हटलं होतं. पण त्यांच्याशिवाय कोणीही आमच्या मदतीला आलं नाही. ही बॉलिवूड इंडस्ट्री फार अक्षम्य आहे”, अशा शब्दांत रजत व्यक्त झाला.

वडिलांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर रजतच्या आजोबांनीही अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर स्वत: रजत इंडस्ट्रीत काम सुरू करेपर्यंत त्याचे कुटुंबीय बॉलिवूडपासून दूर होते. वयाच्या 18 व्या वर्षी रजतने शाहरुख खानच्या ‘जमाना दिवाना’ या चित्रपटात काम केलं होतं. शाहरुख मला प्रेमाने ‘टायगर’ असा म्हणायचा.

रजतने 2000 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘द ट्रेन’, ‘लाइफ मे कभी कभी’, ‘अक्सर’, ‘कोई मिल गया’, ‘रॉकी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. तरीही त्याला अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही. त्याच दशकाच्या मध्यापर्यंत त्याला चित्रपटांचे ऑफर्ससुद्धा येणं बंद झालं होतं. अखेर त्याने अभिनयातून ब्रेत घेतला आणि नवीन उपजीविका शोधण्यासाठी कॅनडाला गेला. अलीकडेच तो भारतात परतला आहे. रजत नुकताच शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये झळकला. या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.