“इथे कोणाला वाईट वाटलं तर..”; ‘बिग बॉस 18’ विजेत्याला रजत दलालकडून धमकी

'बिग बॉस 18'चा फर्स्ट रनर अप रजत दलालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो विजेता करणवीर मेहराला थेट धमकी देताना दिसून येत आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यापासून करणला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

इथे कोणाला वाईट वाटलं तर..; बिग बॉस 18 विजेत्याला रजत दलालकडून धमकी
Karanveer Mehra and Rajat Dalal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2025 | 3:22 PM

अभिनेता करणवीर मेहराने ‘बिग बॉस 18’चं विजेतेपद पटकावलंय. तर रजत दलाल हा फर्स्ट रनर अप ठरला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यापासून करणला सोशल मीडियावर रजतच्या चाहत्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. आता रजत दलालने थेट करणला धमकी दिली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने करणला धमकावलं आहे. “तुझ्या आणि तुझ्या चाहत्यांच्या भांडणांमध्ये माझ्या कुटुंबाचं नाव ओढू नकोस. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यापेक्षा तू तुझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत कर”, असंही त्याने म्हटलंय. करणवीर आणि त्याच्या बाजूने बोलणाऱ्या सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. यानंतर करणवीरनेही रजतवर सडकून टीका केली. या टीकेनंतरच रजतने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाला रजत दलाल?

“आधी असं व्हायचं की जर एखाद्याने माझ्याशी पंगा घेतला, तर त्याला मी जोकरइतकी भीक द्यायचो. आता मी ती गोष्ट सोडली आहे. तुझं भलं यातच आहे की तू तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे, माझ्या समीकरणांना सोडून दे. ते तुला आताही दिसत असेल आणि वेळेनुसार दिसत जाईल. काही बोलायचं असेल तर थेट मला बोला, माझ्या दलाल या नावाला त्यात मध्ये आणू नकोस. हिसाब-किताब काय असतं ते तुला माहीत नाही. या गोष्टींमध्ये पडू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, जग. इथल्या कोणाला वाईट वाटलं तर तुला खूप समस्या जाणवतील. काळजी घे स्वत:ची”, अशी उघड धमकी रजतने दिली आहे.

करणवीर मेहराची पोस्ट-

‘बिग बॉस 18’ जिंकल्यापासून सतत ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या करणवीरने अखेर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित रजतच्या चाहत्यांना सुनावलं. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, ‘सर्व ट्रोलर्सना, द्वेष करणाऱ्यांना, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना, टपरीवर बसलेल्या छपरींना, कोणताही चेहरा नसलेल्या आणि स्वत:ला आर्मी म्हणणाऱ्या दलाल झुंडला मी सांगू इच्छितो.. तुम्ही माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. फक्त मी माझं मत मांडल्यामुळे (तेसुद्धा विचारल्यावरच) तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा अपमान केला आहे. यासाठी तुम्ही वेळ काढून माझ्या जुन्या पोस्टवर जाऊन तिथे वाईट कमेंट्स, शिवीगाळ केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाहीचा इतका गैरवापर पाहून मला धक्काच बसला आहे. ज्यांच्या पाठिशी तुमच्यासारखी लोकं आहेत, त्यांचं आयुष्यात कधी काही भलं होऊ शकत नाही. तुम्ही चाहते नाही, गुंड आहात. विकत घेतलेले, पाळलेले आहात.. ज्यांचं स्वत:चं सामाजिक अस्तित्त्व नाही. तुम्हाला फक्त दुसऱ्यांना खाली पाडून तुमच्या माणसाला वर उचलता येतं. रजत दलाल.. तुझं समीकरण अपयशी ठरलंय आणि करणवीर स्वत:चा खेळ खेळून गेलाय.’