
साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासना कोनिडेलाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये ती IVF आणि एग फ्रिजिंग (Egg freezing) यांना प्रमोट करताना दिसतेय. IIT हैदराबादमधील विद्यार्थ्यांशी बोलताना उपासनाने एग फ्रिजिंगचं महत्त्व सांगितलं. एग फ्रिजिंग हे तरुण महिलांसाठी सर्वांत मोठं इन्शुरन्स आहे, असं ती म्हणाली. याच वक्तव्यावरून उपासनावर जोरदार टीका होत आहे. आयव्हीएफ आणि एग फ्रिजिंगबद्दल बोलून ती तिची कंपनी अपोलो आयव्हीएफचा प्रचार करतेय आणि तरुणींची दिशाभूल करतेय, असा आरोप तिच्यावर केला जात आहे. “एग फ्रिजिंग हे सध्याच्या तरुणींसाठी आवश्यक असून त्यामुळे ते स्वत:च्या अटींवर त्यांच्या जीवनाचं नियोजन करू शकतात”, असा सल्ला उपासनाने दिला.
‘ती मुळात तिच्या अपोलो आयव्हीएफ एग-फ्रिजिंगच्या बिझनेसचा प्रचार करतेय’, असं एकाने म्हटलंय. तर ‘एखाद्याकडे पैसा असेल तर तो काहीही बोलू शकतो. अशा लोकांचं अजिबात ऐकू नका, ज्यांचे आईवडील खूप श्रीमंत आहेत’, असं दुसऱ्याने लिहिलंय. उपासनाच्या मतांशी असहमत असल्याचं म्हणत आणखी एका युजरने म्हटलंय, ‘लग्न ही एक वैयक्तिक निवड आहे, जी एखाद्याच्या विशिष्ट परिस्थितीनुसार केली पाहिजे. हे काही वैज्ञानिक सूत्र नाही जे सर्वत्र लागू केलं जाऊ शकतं आणि त्याचे परिणाम समान असतील.’
‘तुमचा आवाज खूप गोड आहे, अगदी तुमच्या अपोलो हॉस्पिटलच्या बिलाइतकाच. तुम्ही एग फ्रिजिंगसाठी दरवर्षी किती पैसे घेता? 10 ते 20 लाख रुपये?’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ‘ती काहीही बोलू शकते. तिच्याकडे एक हॉस्पिटल आहे आणि तिच्याकडे पैसे आहेत. ती तिचे एग फ्रीज करू शकते आणि त्यासाठी तिला पैसे खर्च करण्याची गरज नाही. जर आपण अपोलोला गेलो तर त्यांची किंमत पाहून आपल्याला जीव द्यावा लागेल. मोफत सल्ला तर प्रत्येकजण देऊ शकतो’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी उपासनावर टीका केली आहे.
उपासना ही अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सी. प्रताप रेड्डी यांची नात आहे. ती अपोलो फाऊंडेशन आणि अपोलो ग्रुप सीएसआर विंगची उपाध्यक्षा आहे. आरोग्यसेवा आणि सामुदायिक उपक्रमांची ती देखरेख करते. 2012 मध्ये तिने अभिनेता राम चरणशी लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर 2023 मध्ये उपासनाने मुलगी क्लिन काराला जन्म दिला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तिने दुसऱ्यांदा गुड न्यूज दिली आहे. उपासना पुन्हा एकदा गरोदर असून यावेळी तिला जुळी मुलं होणार असल्याचं म्हटलं जात आहे.