
दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आयआयटी हैदराबाद इथं तिने तरुण मुलींना एग फ्रीजिंगचा विचार करण्याचा सल्ला दिला आणि ही गोष्ट महिलांसाठी सर्वांत मोठी उपलब्धी असल्याचंही तिने म्हटलंय. या वक्तव्यावरून अनेकांनी उपासनावर टीका करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगदरम्यान आता उपासनाने तिच्या इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित आपली बाजू मांडली आहे. तथ्ये तपासल्याशिवाय तिच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना तिने फटकारलं आहे.
‘सामाजिक दबावाला बळी न पडता एखाद्या महिलेनं प्रेमविवाह करणं चुकीचं आहे का? तिला योग्य जोडीदार मिळेपर्यंत तिने प्रतीक्षा करणं चुकीचं आहे का? एखाद्या महिलेनं तिच्या परिस्थितीनुसार मुलं कधी जन्माला घालायची हे ठरवणं चुकीचं आहे का? लग्न किंवा लवकर मुलं जन्माला घालण्याचा विचार करण्याऐवजी स्वत:चं ध्येय निश्चित करणं आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणं चुकीचं आहे का’, असे सवाल तिने उपस्थित केले आहेत.
अपोलोमधील आयव्हीएफचा प्रचार करत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही तिने उत्तर दिलंय. ‘सत्य तपासा. मी वयाच्या 27 व्या वर्षी लग्न केलं. प्रेम आणि सहवासासाठी मी हा निर्णय घेतला. वयाच्या 29 व्या वर्षी मी वैयक्तिक आणि आरोग्याच्या कारणास्तव एग फ्रीजिंगचा निर्णय घेतला होता. याबद्दल मी नेहमीच मोकळेपणे बोलत आले, जेणेकरून इतर महिलांना त्यांच्या पर्यायांची जाणीव होईल. तुमच्या माहितीकरता मी सांगते की मी माझं एग फ्रीजिंग अपोलोमध्ये केलं नव्हतं. मी माझ्या पहिल्या बाळाला वयाच्या 36 व्या वर्षी जन्म दिला आणि आता वयाच्या 39 व्या वर्षी मी जुळ्या मुलांची आई होणार आहे’, असं तिने पुढे म्हटलंय.
या पोस्टच्या अखेरीस उपासनाने लिहिलं, ‘माझ्या या संपूर्ण प्रवासात मी माझं करिअर घडवणं आणि वैवाहिक आयुष्य जोपासणं यालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. कारण कुटुंब वाढवण्यासाठी आनंदी आणि स्थिर वातावरण अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी लग्न आणि करिअर हे काही प्रतिस्पर्धी नाहीत. ते एका परिपूर्ण जीवनात तितकेच महत्त्वाचे भाग आहेत. पण मी वेळ निश्चित केली आहे. हा माझा अधिकार आहे.’
“महिलांसाठी सर्वांत मोठा विमा म्हणजे एग फ्रीजिंग. कारण त्यामुळे तुम्ही लग्न कधी करायचं, स्वत:च्या अटींवर मुलं कधी जन्माला घालायची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कधी व्हायचं हे निवडू शकता. या सर्व गोष्टींच्या निवडीचं स्वातंत्र्य तुमच्या हाती असतं”, असं ती म्हणाली होती.